गणेशतत्त्वही मी आता सर्वत्र पाहीन

गणेशतत्त्वही मी आता सर्वत्र पाहीन

Published on

संतांचे संगती .......लोगो
(२८ ऑगस्ट टुडे ३, फोटोसह घ्यावी चितळे)
समर्थ श्री रामदास स्वामी गणेशस्तवनाच्या पहिल्या ओवीतच श्री गणेशांचे कार्य सांगितले आहे. श्री गणेश हे गणनायक आहेत. गण या शब्दाचा एक अर्थ तुकडीसमूह असा होतो तर दुसरा अर्थ इंद्रिय असा होतो. आपल्या सर्व इंद्रियांवर सत्ता चालवणारे श्री गणनायक गणपती आहेत. या श्री गणेशांच्या कृपेमुळे भक्तांचे अज्ञान नष्ट होते. तसेच मी म्हणजे देह आहे. मी आणि देव वेगळे आहोत, अशा प्रकारचे जे भ्रम भक्तांच्या मनात असतात त्या भ्रमाचे निराकरणही श्री गणेश करतात म्हणूनच ते अज्ञानभ्रांतीछेदक आहेत.
- rat३p९.jpg-

- धनंजय चितळे, चिपळूण
---
गणेशतत्त्वही मी आता सर्वत्र पाहीन
या विश्वाची निर्मिती ज्या प्रणवातून झाली त्या प्रणवाचे व्यक्तरूप म्हणजेच श्री गणेश. तेच या विश्वाचे आधी रूप आहेत, याचा बोध करून देणारे मंगलमूर्ती श्री गणेश हे बोधरूप आहेत. परमार्थिक उपासनेमध्ये अष्टमहासिद्धींचा उल्लेख येतो. या सर्व सिद्धींच्या प्राप्तीमुळे जे फळ प्राप्त होते ते फळ आपल्या भक्तांना देणारे श्री गणेश सर्व सिद्धीफलदायक आहेत म्हणूनच त्यांना नमस्कार असो. दासबोधातील मूळ ओवी अशी आहे,
ओम नमोजी गणनायका। सर्व सिद्धिफलदायका।
अज्ञान भ्रांतीछेदका। बोध रूपा।।
विघ्ननिवारक श्री गणरायांची स्तुती करण्यामागे श्री समर्थांचा कोणता उद्देश आहे. श्री समर्थ म्हणतात,
ऐसा हा मंगलमूर्ती । तो म्यां स्तविला यथामती।
वांच्छा धरून चित्ती। परमार्थाची।।
श्री समर्थांना सुखकर्ता मंगलमूर्ती श्री गणेशांकडून कोणतीही ऐहिक इच्छा पूर्ण करून घ्यायची नाही तर त्यांना परमार्थाची प्राप्ती करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे व्यवहारात विविध अडचणी येतात त्याचप्रमाणे परमार्थामध्ये अनेक प्रकारची विघ्ने येत असतात. उपासनेत सातत्य न राहणे, परमार्थिक उपासनेविषयी आळस निर्माण होणे. आपण परमार्थिक साधना करतो म्हणजे आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करतो आहोत. आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, अशी विपरित भावना मनात निर्माण होणे यासारखी अनेक घातक विघ्ने साधकाला त्रास देत असतात. यापेक्षा सगळ्यात मोठे विघ्न म्हणजे मी परमज्ञानी झालो, अशी भावना मनात निर्माण होणे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या विघ्नांचे निवारण करण्यासाठी विघ्नहर्ता श्री गणेशांची उपासना महत्त्वाची ठरते. श्री मुद्गल पुराणामध्ये मंगलमूर्ती श्री गणेशांनी मोहासूर मदासूर, क्रोधासूर, अहंअसूर, मत्सरासूर अशा असुरांना पराभूत केल्याची माहिती आली आहे. विशेष म्हणजे यातील कोणत्याही असुराला श्री गणेशांनी ठार मारले नाही तर त्यांना नियंत्रित केले आहे आणि त्यांना आज्ञा केली आहे की, जो स्वधर्माचरण करत असेल आणि जो भगवद्भक्तीत रममाण झाला असेल त्याला पीडा देऊ नये. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे म्हणत की, विकारांना आपण वापरावे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवू नये. श्री गणेशांनी एकाप्रकारे हेच शिकवले आहे. समर्थ श्री रामदासांनी मनोबोधात
नकोरे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी।
नको रे मना लोभ हा अंगीकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ।।
असे सांगितले आहे. अर्थात, जे परमार्थाला अहितकारक आहे ते नको त्या गोष्टींचा त्याग करा, असे त्यांना सांगायचे आहे. साधकाच्या परमार्थिक आयुष्यात येणारी ही वेगळ्या आहेत. श्री गणेशांच्या ध्यानाचे वर्णन केल्यानंतर त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा हे साधकाच्या लक्षात येते आणि तो साधक आपल्या आचरणात योग्य ते बदल करण्याचा अभ्यास करू लागतो. अभ्यास म्हणजे केवळ वाचन, लेखन, पाठांतर असे नाही तर जी तत्त्वे आपण समजून घेतली त्यांचे आपल्या आचरणात रूपांतर करणे म्हणजे अभ्यास असा अभ्यास केला तर तो जीव परमार्थाकडे वळू शकतो. भाद्रपद महिन्यात येणारा हा गणेशोत्सव म्हणजे सगुणाचेनि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, या वचनाप्रमाणे प्रथम सगुणात म्हणजे मूर्तीरूपात भगवंतांची आराधना करावी आणि मग तेच भगवत तत्त्व चराचरात पाहावे, हे शिकवणारा उत्सव आहे म्हणूनच येथे मातीच्या मूर्तीची उपासना सांगितली आहे, ती माती ज्याप्रमाणे पाण्यात विरघळून वनस्पती आणि इतर सजीवसृष्टीत जाते त्याप्रमाणे ज्या गणेशतत्त्वाची मूर्ती रूपात उपासना केली ते तत्त्वही मी आता सर्वत्र पाहीन. ही भक्ताची भूमिका होण्यासाठी हा उत्सव महत्त्वाचा आहे.
वाचक आहोत म्हणून आपण हा सर्व विचार करू शकतो. आपला देह परमार्थासाठी वापरू शकतो. याचे कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळातील पूर्वजांचे वर्षातून एकदातरी स्मरण करणे, हीच गणेशोत्सवानंतर येणाऱ्या पितृपक्षामागची भूमिका आहे. पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन भक्तीमार्गातील नवविधा भक्ती सुरू करणे हेच नवरात्र आहे, पटतंय ना? म्हणूनच श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकाने आजच्या भागाला विराम देऊया. पुढील भागात नवरात्र उत्सवाचे चिंतन करूया.

गजमुख सुखदाता मानसी आठवावा। मग विमलमतीचा योग पुढे करावा।
सुरवरमुनि योगी वंदिती धुंडी राजा। सकळ सफल विद्या यावया आत्मकाजा।।
।। मंगलमूर्ती मोरया।।
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

Marathi News Esakal
www.esakal.com