-गणेशोत्सव मिरवणुकीला आणीबाणीचा जाच
टिळक आळी गणेशोत्सव शताब्दी---लोगो
गणेशोत्सव मिरवणुकीला आणीबाणीचा जाच
अखेर शहाणपण जिंकले ; उत्सवाची प्रतिष्ठा आणखी भर पडली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः आणीबाणीच्या कालखंडात गणेशोत्सवालाही त्याचा जाच व्हायची वेळ आली होती; मात्र या गणेशोत्सवाची प्रसिद्धी त्याबद्दलचे रत्नागिरीकरांना असलेले महत्त्व आणि प्रशासनातील दोन स्थानिक कर्मचाऱ्यांनी परवानगी नाकारू नये याबाबत वरिष्ठांना दिलेली माहिती यामुळे मिरवणुकीसाठी परवानगी मिळवणे शक्य झाले.
जून १९७५ मध्ये आणीबाणी घोषित झाली. टिळक आळी परिसरामध्ये संघ जनसंघाचे अनेक कार्यकर्ते व नेते राहात असल्याने शासनाची ‘मेहेरनजर’ होतीच. गणेशोत्सव आणीबाणीच्या ऐन दडपशाहीच्या काळात, तत्कालीन भयग्रस्त वातावरणात गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी जाणे म्हणजे तत्कालीन प्रशासनाच्या नजरेत भरणे. कोणी कदाचित सार्वजनिक जीवनात वावरताना घडलेल्या किरकोळ प्रसंगाचे उट्टे काढण्याची संधीही साधेल, असे ते दिवस. त्यामुळे परवानगीसाठी जाणे हे कठीणच काम होते. आणीबाणीचा काळ त्यामुळे सारे काही आक्रसलेले. परिणामी, कार्यक्रमही तसे फारसे ठरत नव्हते. मिरवणूक हा तर मानबिंदू; परंतु आगमन मिरवणुकीच्या दिवशी सकाळपर्यंत परवानगी हातात नव्हती. सर्वच प्रशासन ताठ!
सकाळी १० वाजता टिळक आळी उत्सवातील काही कार्यकर्ते, त्यात धनंजय भावे अग्रणी कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर परवानगीसाठी गेले. अधिकारीवर्गही मोठ्या जोरात, थोड्याशा रागानेच अधिकाऱ्यांकडे परवानगीची चौकशी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकारी दंडाधिकारी यांनी उडवूनच लावले. कार्यकर्त्यांनी सांगितले, मिरवणूकही निघणारच. सरकारला जी कार्यवाही करायची असेल ती करू शकता. आम्ही शिस्तीत वागणारी मंडळी आहोत. देवकार्याला कृपया अडचण आणू नका. वातावरण तंग झाले. साळवी आणि पावसकर या तत्कालीन कनिष्ठ लिपिकांनी कार्यकारी दंडाधिकारी यांना टिळक आळी गणेशोत्सवाबाबत मध्येच माहिती दिली. वातावरण बदलले, बारा बाजता परवानगी प्रेमाने हातात पडली. कार्यकर्त्यांनी जरी जोरात मागणी केली, जोराने बोलले तरी श्री गजाननाच्या बळावरच ते घडले असावे. तेव्हाही रत्नागिरीच्या नागरिकांचे टिळक आळी गणेशोत्सवाबाबात अनाहूतपणे दाखवलेले प्रेमच वेळी उपयोगी पडले आणि हे प्रेम निर्माण होण्यास वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांनी जपलेली अनुशासित परंपराही उपयोगी पडली. परवानगी न मिळते तर मोठाच पेच निर्माण झाला असता. गजाननाच्या कृपेने ऐन आणीबाणीतही विघ्नहर्त्याच्या कृपेने आगमन आणि विसर्जन दोन्ही मिरवणुका कोणत्याही विघ्नाविना पार पडल्या. पारावर १९२४ ते १९३७ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अनेक भाषणे उत्सवकाळातही झाल्याचेही सांगितले जाते. या भाषणासाठी आजूबाजूच्या गावातील लोक बैलगाडीतून आवर्जून उपस्थित राहात असत.
चौकट
महात्मा गांधी, कस्तुरबांचे गणेशदर्शन
राजकीय वातावरणाचा कोणताच परिणाम उत्सवावर कधीच झाला नाही. २२ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा गांधींसोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उपस्थितीत पारावर येऊन श्री गणपतीचे दर्शन घेतल्याचे जाणकार सांगतात. या वेळी त्यांनी टिळक जन्मभूमीलाही भेट दिली होती. सावरकर पंथीय म्हणवून घेणारे आज गांधीजीं विरोधात विखारी बोलतात. विखार पसरवत आहेत. त्या काळात गांधीजींसोबत सावरकर गेले होते, ही घटना उत्सवकाळातील मोकळ्या वातावरणातील कल्पना देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.