भाजीपाल्यावरही आता फळमाश्यांचा हल्ला

भाजीपाल्यावरही आता फळमाश्यांचा हल्ला

Published on

swt513.jpg व swt514.jpg
N89743, 89744
देवगडः येथे भाजीपाला उत्पादनाचे फळमाशीमुळे नुकसान झाले आहे. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी)

भाजीपाल्यावरही आता फळमाश्यांचा हल्ला
शेतकरी हतबलः सामूहिक बंदोबस्ताचा करावा लागणार विचार
संतोष कुळकर्णीः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ ः आंबा हंगामात बागायतदारांना सतावणाऱ्या फळमाशीचा (बॅक्ट्रोसेरा डॉरसॅलीस) उपद्रव आता भाजीपाला उत्पादनावरही जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या भाजीपाला उत्पादनाचे फळमाशीकडून नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील भाजीपाल्याबरोबरच भोपळा, काकडी, चिबुड आदी शेती उत्पादनांवर फळमाशीचा उपद्रव वाढल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे फळमाशीचा सामूहिक बंदोबस्त करण्याची आवश्यकता बनली आहे.
अलीकडील काही वर्षांत आंबा हंगामामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवतो. फळमाशीमुळे आंबा बागायतदार हैराण असतात. फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रसंगी रक्षक सापळे लावले जातात. यासाठी बागायतदार शेतकरी आवश्यक मेहनत घेतात; मात्र तरीही फळमाशीची उत्पत्ती काही कमी होताना दिसत नाही. आंबा बागायतदारांची झोप उडवणारी फळमाशी अजूनही पूर्णपणे संपलेली दिसत नाही. अजूनही फळमाशीचा वावर असून सद्यस्थितीत घरापरिसरातील केळी, चिकू, पेरू आदी कोकणातील फळपिकांबरोबर ग्रामीण भागात पिकविल्या जाणाऱ्या पडवळ, भोपळा, भेंडे, चिबुड, काकडी आदी उत्पादनांवर फळमाशीचा हल्ला होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यात हक्काचे असलेले शेती उत्पादन अडचणीत सापडल्याने कष्टकरी शेतकरी कुटुंबे हतबल होतात. अलीकडील काही वर्षांत आंबा हंगामात बागायतदार फळमाशीने पुरते हैराण असल्याचे दिसतात. केवळ आंबा बागायतीमध्येच नव्हे तर, बाजारपेठेतील विक्रीस असलेल्या आंब्यावरही फळमाशी हल्ला करीत होती. आता आंबा हंगाम सरला तरी फळमाशीचा जीवनक्रम संपण्याची लक्षणे काही दिसत नाहीत. घरापरिसरातील चिकू, पेरू आदी फळांवर फळमाशीचा दंश असतो. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेली पडवळ, भेंडे, दोडका, भोपळा, काकडी, चिबुड आदी भाजीवर फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवल्याने भाजीपाला कुजण्याची प्रक्रिया झाली. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हैराण आहेत. यातून नुकसानीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. फळमाशीचे विविध प्रकार असल्याचेही सांगितले जाते.

चौकट
अशी असते फळमाशी...
फळमाशी किंचित पिवळसर तांबूस रंगाची असून ७ मिलीमीटर लांब असते. पोटाचा शेवटचा भाग टोकदार असतो. अळी पांढरट रंगाची असून एका बाजूस निमुळती असते. तिला पाय नसतात. मादी माशी फळे पक्व होण्याच्या अवस्थेत आल्यावर सालीच्या आतमध्ये अंडी घालते. सर्वसाधारणपणे एक माशी १५० ते २०० अंडी घालते. अंडी एक ते तीन दिवसांत उबतात. अळीचा कालावधी १२ ते १४ दिवसांचा असतो. त्यानंतर अळ्या फळातून जमिनीवर पडून जमिनीत कोष तयार करतात. कोषावस्थेचा कालावधी ६ ते ९ दिवसांचा असतो. अळी फळावरील गरावर उपजिविका करते. सुरुवातीला ज्या ठिकाणी अंडी घातलेली असतात, त्या ठिकाणची जागा तांबूस दिसते. नंतर फळाचे पूर्णपणे नुकसान होते.

चौकट
गणेशोत्सवात मोठा फटका
जिल्ह्यात पावसाबरोबरच हिवाळी हंगामात काकडी, चिबुड, भोपळा याचे उत्पादन घेतले जाते. गणेशोत्सव काळात या उत्पादनांना मोठी मागणी असते. काहीजण व्यावसायिक पध्दतीने याचे उत्पादन घेतात. अशा शेतकर्‍यांना फळमाशीचा उपद्रव जाणवला. त्यामुळे काही प्रमाणात नुकसानही सोसावे लागल्याचे सांगितले जाते. काही छोटी कुटुंबे भाजी उत्पादनावर कुटुंब चालवतात. अशा कुटुंबाना फळमाशीमुळे अडचण भासते.

चौकट
‘रक्षक सापळा’चा खर्च न परवडणारा
फळमाशीच्या बंदोबस्तासाठी ‘रक्षक फळमाशी सापळा’ फायदेशीर ठरू शकतो, अशी कृषी विभागाची शिफारस असते; मात्र भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा खर्च परवडण्यासारखा नाही. छोट्या शेतकऱ्यांना खर्च परवडणारा नसतो.

चौकट
भाजीपाला कुजण्याची भिती
फळमाशीचा उपद्रव बाजारात विक्रीस ठेवलेले टॉमेटो तसेच अन्य फळांवरही जाणवतो. यामुळे व्यावसायिक देखील हैराण असतात. फळमाशीने फळांवर दंश केला असल्यास चटकन दिसून येत नाहीत; मात्र जास्त दिवस राहिल्यास फळे, भाजीपाला कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.

कोट
फळमाशी आंबा, पेरू, डाळिंब, पपई, भेंडी, कारली अशा अनेक फळे आणि फळभाज्यांना बाधा करणारी उपद्रवी कीड आहे. या माशा आकाराने लहान असतात. रंग पिवळसर तपकिरी, पंखांवर ठिपके असतात. फळे कुजतात, डाग पडतात, अकाली गळतात. फळातील गर खराब होण्याने बाजारातील विक्रीयोग्य उत्पादन घटते. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी एकत्रित उपाय केल्यास परिणाम जास्त मिळतो. पावसाळ्यातील वातावरण ओलसर व उबदार राहत असल्याने फळमाशीचे प्रमाण जास्त वाढते. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आंबा आणि भाजीपाला उत्पादनावर जाणवणाऱ्या फळमाशीचा प्रकार वेगळा असू शकतो. भाजीपाला उत्पादनाचा आवाका पाहता, यासाठी रक्षक सापळ्याचा वापर खर्चिक बनू शकतो. फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रक्षक सापळेच फायदेशीर ठरू शकतात.
- दिगंबर खराडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, देवगड
..............................
कोट

swt515.jpg
89745
अभय बापट

अलीकडच्या काळात फळमाशी केवळ आंबा फळांपुरती मर्यादित राहिलेली नसून त्याचे लोण आता ग्रामीण भागातील काकडी, चिबुड, भोपळा, पडवळ, दोडकी आदी कृषी उत्पादनापर्यंत पोहोचले आहे. यामुळे आठवडी बाजार किंवा शहरात भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामीण भागातील छोट्या कुटुंबांना त्याचा फटक बसला आहे. यामुळे भाजीपाला, फळे उत्पादनांचे मोठे नुकसान अलीकडच्या काळात होताना दिसते. फळमाशीच्या बंदोबस्तासाठी रक्षक सापळा वापरणे हा शंभर टक्के प्रभावी उपाय ठरेल, असेही नाही. फळमाशीच्या नियंत्रणासाठी संशोधन होऊन मार्ग काढला गेला पाहिजे.
- अभय बापट, प्रयोगशील शेतकरी, मोंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com