रोटरीचे अर्थवशिष्य पठण
‘रोटरी’ चे
अथर्वशीर्ष पठण
खेड ः तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी खेडचा महाराजा या सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करत वातावरण भक्तिमय केले. चौदा विद्या व चौसष्ट कलेचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्याच्या उत्सवात यंदाही विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांचे अचूक शब्दोच्चार आणि पठणाच्यावेळी आवाजातील लयबद्धता तसेच चढ-उतार यांनी सर्व भक्तगण श्री गणपती अथर्वशीर्ष श्रवणात मग्न झाले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुस्पष्ट अथर्वशीर्ष पठण केल्यामुळे उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कदम महाविद्यालयात
रेड रिबन क्लब
खेड ः भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक विलास म्हस्के यांनी रेड रिबन क्लब आणि एड्स रोगाविषयी माहिती दिली. दीपाली मोरे यांनी तरुण पिढीवर व्यसनाधीनतेचे होणारे परिणाम या विषयी माहिती दिली. या प्रसंगी संस्थाध्यक्ष भिकू गोवळकर, सचिव अॅड. तु. ल. डफळे, सहसचिव दत्तात्रय धुमक, खजिनदार राजाराम बैकर, सदस्य बाबाराम तळेकर, प्राचार्य विनोद साळुंखे उपस्थित होते.
कशेडी-गावणकरवाडी
शाळेस संगणक भेट
खेड ः तुर्भे नवी मुंबई येथील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील कशेडी- गावणकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संगणक संच सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी कशेडी येथील श्रीस्वामी शाळेचे समर्थ मठाचे व्यवस्थापक समीर मोरे, कशेडी-गावणकरवाडी मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर, कशेडी-लिटी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पांगूळ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन मादगे, अजित गावणकर, वर्षा मादगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर कोळेकर यांनी केले.
खेडचे जीवन आंब्रे
यांचा प्रामाणिकपणा
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते राजापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराची आवाशीनजीक रोख रक्कम व आवश्यक कागदपत्रे असलेली हरवलेली बॅग पंचायत समितीचे माजी सभापती जीवन आंब्रे यांना सापडली. बॅगेतील कागदपत्रांवरून त्यांच्याशी संपर्क साधत बॅग सुपूर्द केली. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-निवे येथील शैलेश चिकणे व राजापूर येथील त्यांचा मित्र राजेश कदम हे दुचाकीवरून प्रवास करत होते. या वेळी दुचाकीला बांधलेली बॅग आवाशी हद्दीत खाली पडली. ही बाब दोघांच्याही लक्षात आली नाही. याचदरम्यान जीवन आंब्रे हे मार्गावरून प्रवास करत असताना बॅग दृष्टीस पडली. बॅगेमध्ये रोख रक्कम व कागदपत्रे होती. या कागदपत्रांवरून संपर्क साधत त्यांना बोलावून घेत बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली.
संगमेश्वर पोलिस वसाहतीच्या
गणपतीचे विसर्जन
संगमेश्वर ः संगमेश्वर पोलिस ठाणे वसाहतीच्या गणपतीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीचे विसर्जन दरवर्षी इतर गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर केले जाते. अनेक पोलिस बंदोबस्ताला असल्याने त्यांना घरी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीच्या मिरवणुकीसह इतर कार्यक्रमांमध्ये पोलिस उत्साहाने सहभाग नोंदवतात. यावर्षीही पोलिस कुटुंबीयांच्या सार्वजनिक गणपतींचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले.