रस्त्याची उंची वाढवून वाहतूक कोंडी टळेल
रस्त्याची उंची वाढवून वाहतूक कोंडी टळेल
जयप्रकाश नार्वेकर ः राजापुरात प्रस्ताव या आधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १०ः राजापूर तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र आणि बाजारपेठ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वर्षानुवर्षे कायम राहिली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी जवाहरचौकातील पूल-आंबेवाडी रस्ता ते गोळीबार मैदान (हर्डी) या रस्त्याची उंची वाढवण्यासह आणखी काही उपाय माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर यांनी सुचवले आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांसह वाहनचालक त्रस्त झाल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त (ता.२९ ऑगस्ट) प्रसिद्ध करून साऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे नार्वेकर यांनी केली आहे. शहरामध्ये मोठ्या संख्येने ये-जा करणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी मोकळी वा नजीकची जागा उपलब्ध नसल्याने वाहनांची वर्दळ अन् गर्दीच्या रस्त्यावर, वाहतुकीच्या मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये दुकानांच्यासमोर वाहने पार्किंग करून ठेवली जातात. शहरामध्ये दिवसागणिक वाहतूक कोंडी वाढत आहे. त्याचवेळी शहराची भौगोलिक रचनाही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरताना दिसत आहे. अनेकवेळा नो पार्किंग फलकांच्या खाली वाहने पार्किंग करून ठेवलेली असल्याने हे नो पार्किंगचे फलक केवळ शोभेचे बाहुले ठरताना दिसत आहेत. या साऱ्या स्थितीकडे ‘सकाळ’ने वृत्ताद्वारे लक्ष वेधले होते. त्याचवेळी शहरातील मुख्य रस्त्यासह जवाहरचौकामध्ये होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजनांची आखणी करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत यांनाही नार्वेकर यांनी निवेदन दिले आहे.
चौकट
नियोजन मंडळामध्ये यापूर्वी मंजूर
वेळेसह इंधनाची बचत करणाऱ्या जवाहरचौक पूल-आंबेवाडी-गोळीबार मैदान (हर्डी) या पर्यायी मार्गाचा आंबोळगड, कशेळी, देवीहसोळ, भालावली, रत्नागिरी आदी भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांनी अवलंब करावा. या रस्त्याची नदीपात्रापासून उंची वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळामध्ये मंजूर झाला होता. त्याचे अंदाजपत्रकही त्या वेळी बांधकाम विभागाने तयार केले होते; मात्र, आता नव्याने या पर्यायी मार्गाची पाहणी करून रस्त्याची उंची वाढवावी, राजापूर हायस्कूल ते राजापूर अर्बन बँक-जवाहरचौक या भागामध्ये बेशिस्तपणे गाड्या पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांमार्फत योग्य ती कारवाई व्हावी, अशा सूचना नार्वेकर यांनी केल्या आहेत.
---