क्राईम
पोलिसावर हल्ला करणाऱ्याला अटक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या शिरगांव-मयेकरवाडी येथील कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावरच हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. अमोल अवधूत मयेकर (रा. मयेकरवाडी शिरगाव, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ८) रात्री घडली. या प्रकरणी जखमी पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, सोमवारी रात्री संशयित अमोल मयेकर हा त्याचा चुलत भाऊ समीर शशिकांत मयेकर याला सुरा काढून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घाबरलेल्या समीरने शहर पोलिस ठाण्यात फोन करून मदत मागितली. शहर पोलिसांची डायल ११२ ही गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. फिर्यादी पोलिस कर्मचाऱ्याने कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने संशयिताला डायल ११२ गाडीत मागे बसवून शहर पोलिस ठाण्यात येत असताना संशयित अमोल मयेकरने त्याच्या गाडीत मागे ठेवलेले हेल्मेट फिर्यादी पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात जोरात मारले. या मारहाणीत त्यांच्या दातांना आणि तोंडाला मार लागून जखमी झाले. फिर्यादी हे कायदेशीर कर्तव्य करत असताना त्यांना कर्तव्यापासून परावृत्त केले तसेच संशयिताने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला करून दुखापत केली. मनाई आदेशात सुरा बाळगून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
-------
वाहतुकीस अडथळा
करणाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी ः जवाहरचौक ते गणेशघाट (ता. राजापूर) येथील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकसुद इनायत सोलकर (वय ४४, रा. नाणार इंगळवाडी, राजापूर) व आनंद नामदेव कोळेकर (वय ५५, खडपेवाडी, राजापूर) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. ८) सकाळी सव्वादहा ते साडेअकराच्या सुमारास जवाहरचौक ते गणेशघाट व जवाहरचौक पिकअप् शेड येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन फाळके यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मालवाहतूक टेम्पो वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, असा पार्क करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचित सुनील जाधव (वय २५, रा. मठ मराठवाडी, ता. लांजा) असे संशयित चालकाचे नाव आहे. या प्रकरणी साहाय्यक पोलिस फौजदार साक्षी भुजबळराव यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
धुंदरे येथील
शिक्षकाची आत्महत्या
रत्नागिरी ः लांजा तालुक्यातील धुंदेरे येथील शिक्षकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश हरिश्चंद्र पांचाळ (वय ३५, रा. धुंदरे सुतारवाडी, ता. लांजा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ८) रात्री घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पांचाळ हे गणपती विसर्जनानिमित्त शेजारी जेवणाला गेले होते. तेथून तो परत घरी आला व पुन्हा घरातून बाहेर जात असताना आईने कुठे जातोस, विचारले असता बाहेर जाऊन येतो, असे सांगतले. त्यानंतर ते बराचवेळ घरात आलेच नाही. त्या वेळी वाडीतील लोकांनी शोधाशोध केली. त्या वेळी घराच्या परिसरातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत अविनाश पांचाळ दिसले. तत्काळ त्यांना तेथून उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता रात्री तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.