कुडाळात २२ सप्टेंबरपासून जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
swt1017.jpg
90616
श्री देव कुडाळेश्वर
कुडाळात २२ सप्टेंबरपासून
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः प्रतिवर्षाप्रमाणे येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी ५० वी (कै.) अॅड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा नवरात्र उत्सवामध्ये आयोजित केली आहे. या स्पर्धेत २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत १० दिवस दररोज सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पाच भजने सादर होतील.
यावर्षी या भजन स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने भव्य स्वरुपात आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी प्रथम ५० हजार, व्दितीय ३० हजार, तृतीय २० हजार, चतुर्थ १० हजार व पाचव्या क्रमांकास ५ हजार रुपये बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक, पखवाजवादक, हार्मोनियम, तबला, उत्कृष्ट झांजवादक यांना वैयक्तिक रोख बक्षिसे, भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेण्याऱ्या प्रत्येक मंडळाला रुपये एक हजार रुपये मानधन व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून दोन टप्प्यात होणार आहे.
यामध्ये २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ५ भजने सादर होतोल. या दहा दिवसांमधून अंतिम फेरीसाठी एकूण १२ मंडळे निवडण्यात येतील. या १२ मंडळांची अंतिम फेरी २ ते ५ ऑक्टोबर कालावधीत होणार असून चार दिवस प्रत्येक दिवशी तीन भजने सादर करण्यात येतील. स्पर्धेचे प्रवेश अर्ज ११ ते २० सप्टेंबरपर्यंत महेश कुडाळकर (श्री कुडाळेश्वर मंदिर) येथे स्वीकारले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन मंडळांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाने केले आहे.