शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना मराठीचे धडे

शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना मराठीचे धडे

Published on

swt102.jpg
90550
कौशिक लेले.
swt103.jpg
90551
मराठी शिकण्याचे ऑनलाईन धडे कौशिक लेले यांच्याकडून घेताना परदेशी नागरिक.

शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना मराठीचे धडे
कौशिककडून मोफत शिकवणीः मायबोली जागतिक नकाशावर नेण्यासाठी धडपड
नीलेश मोरजकरः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः जगभरात इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच अशा आंतरराष्ट्रीय भाषांचा दबदबा असताना, आपली मायबोली ‘मराठी’ ही जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा अनोखा प्रयत्न संगणक अभियंता असलेल्या कौशिक लेले या एका सामान्य पण जिद्दी युवकाने केला आहे. मराठीचा प्रचार व प्रसार जागतिक पातळीवर व्हावा, यासाठी हा युवक झटत आहे. गेली तेरा वर्षे तो परदेशी नागरिकांसह अमराठींना मोफत मराठी भाषा शिकवत असून त्याचे शेकडो विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आदी देशांत आहेत.
कौशिक लेले हे आयटी क्षेत्रात कार्यरत असून संगणक अभियंता आहेत. ते पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतात. भाषाशास्त्र आणि मराठी साहित्य यांच्याबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. मराठीचा प्रसार व्हावा, ही भावना त्यांनी कृतीत उतरवली आणि २०१२ मध्ये सुरू केलेल्या ऑनलाईन वर्गांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन माध्यमातून ते आठवड्यातून दोन वेळा वर्ग घेतात. त्यांनी स्वतः तयार केलेले अध्ययन साहित्य, सरावपत्रिका, ऑडिओ, व्हिडिओ साधने यांचा वापर करून ते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात. त्यांच्या या वर्गांमध्ये अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील नागरिक सहभागी होतात. यातील अनेकांचे जोडीदार मराठी असतात, काहींना मराठी साहित्याची गोडी असते, तर काही फक्त एका नव्या भाषेची ओळख करून घेण्याच्या इच्छेने येतात.
याबाबत श्री. लेले म्हणाले, ‘‘नोकरी करत असलेल्या माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांना मराठी शिकायची इच्छा होती. मी त्यावेळी अनेक पुस्तके शोधली तसेच ऑनलाईन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला; पण तेव्हा मला जाणवलं की मराठी शिकवणाऱ्या वेबसाईट किंवा पुस्तके उपलब्ध नाहीत. साधने अतिशय तुटपुंजी आहेत. मराठी लोकांनी मराठी शिकावे असे आपण म्हणतो, पण त्यांना मराठी शिकता यावी, यासाठी सोप्या, परिणामकारक सोयी आपण तयार केल्या नाहीत. माझ्या भाषेच्या आवडीमुळे हे काम मी स्वतःच करायचे ठरविले. सध्याच्या इंटनेटच्या युगात सर्व गोष्टी ऑनलाईनच शोधल्या जातात. त्यामुळे अशी सोय छापील पुस्तकापेक्षा ऑनलाईन धडे आणि व्हिडिओच्या स्वरुपात उपलब्ध झाली पाहिजे, हा त्यामागचा विचार करून मराठी भाषा अध्ययनास सुरुवात केली. सेवाभावी वृत्तीने हे करत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. यासाठी मी स्वतःची बेबसाईट देखील सुरू केली आहे. सध्या ४२१ विद्यार्थी मराठी शिकत असून त्यातील ३३ परदेशी व्यक्ती आहेत. अमेरिकेतील अकरा जण, जर्मनीतील तीन, जपानमधील दोन विद्यार्थी असून कोस्टारिका, फ्रान्स, युके, रोमानिया, चीन अशा वेगवेगळ्या देशातील प्रत्येकी एक व्यक्ती मराठी शिकत आहे."

चौकट
विविध उपक्रम, पुरस्कार
समाजातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. परदेशी विद्यार्थ्यांना मराठी बोलताना बघून सर्वांनाच अप्रूप वाटते. रवींद्र चव्हाण यांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘आदर्श डोंबिवलीकर’ तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मातृगंध संस्थेने ‘मराठी मानबिंदू’ या पुरस्कारांनी श्री. लेले यांचा सन्मान केला आहे. ते चिनी भाषा शिकत असून यावर्षी तिसऱ्या पातळीची परीक्षा ते ९३ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. त्या भाषेचा पुढचा अभ्यास करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर मराठीतून शिकता यावी, यासाठी ‘गंमत चिनी भाषेची मराठीतून’ हे व्हिडिओ त्यांनी बनविले आहेत. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘तमिळ चित्रपट गीतांचे अर्थ आणि बोल मराठीत’ असाही उपक्रम सध्या सुरू आहे. अशा प्रकारे मराठी आणि इतर भाषांची देवाण-घेवाण करत मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होण्यासाठी नक्कीच वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करण्यावर त्यांचा भर आहे.

चौकट
संस्कृतीचेही शिक्षण
श्री. लेले हे केवळ मराठी भाषा शिकवत नाहीत तर मराठी सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा, इतिहास अशा अनेक विषयांचा परिचयही करून देतात. ‘गणेशोत्सव’, ‘गुढी पाडवा’ यांचे अर्थ, परंपरा, गीते हे सर्व ते शिकवतात.

कोट
मराठी ही माझ्यासाठी फक्त भाषा नाही, ती एक भावना आहे. ही भावना जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल, तितके माझे जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटेल. या भाषेमध्ये आत्मियता आणि गोडवा आहे. मराठी भाषा माणसे जोडते, संस्कृती जपते आणि ओळखी वाढविते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे चांगलेच झाले. पण मराठीला आधुनिक भाषेचा दर्जा आपण मिळवून देऊ तो खरा आनंदाचा आणि स्वकर्तृत्वाच्या अभिमानाचा दिवस असेल.
- कौशिक लेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com