दिव्यांग भजन मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप

दिव्यांग भजन मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप

Published on

swt114.jpg
90788
कुडाळः रोटरी क्लबतर्फे दिव्यांग बांधव भजन मंडळातील सदस्यांना छत्र्या व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. (छायाचित्रः अजय सावंत)

दिव्यांग भजन मंडळाच्या
पाठीवर कौतुकाची थाप
कुडाळ रोटरीचा उपक्रमः सदस्यांना छत्र्या, कापडी पिशव्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः रोटरी क्लब ऑफ कुडाळतर्फे दिव्यांग बांधव भजन मंडळातील सदस्यांना छत्र्या व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि एकोप्याचा सण आहे. या उत्सवाच्या काळात कुडाळमधील दिव्यांग बांधवांचे भजन मंडळ दरवर्षी घराघरांत जाऊन सुंदर भजनांद्वारे भक्तिमय वातावरण निर्माण करत असते.
पावसाळ्याच्या दिवसांत हे मंडळ आपल्या कष्टाने व श्रद्धेने समाजात आनंदाची उधळण घडवून आणते. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी कुडाळ रोटरी क्लबतर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. येथील भैरव मंदिरात आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग बांधव भजन मंडळातील सदस्यांना छत्र्या व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन सेवेला सहाय्यभूत ठरणारा सामाजिक उपक्रम रोटरी क्लबने राबविला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, रुपेश तेली, आनंद वेंगुर्लेकर, डॉ. शिल्पा पवार तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दिव्यांग बांधव भजन मंडळाच्या सदस्यांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत रोटरी क्लबचे आभार मानले. समाजातील विविध स्तरांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या हेतूने रोटरी क्लब सातत्याने सामाजिक उपक्रम हाती घेत असल्याचे अध्यक्ष पवार यांनी यावेळी सांगितले.
रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या काळात समाजातील उपेक्षित घटकांना मदत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हीच खरी रोटरीची सेवा परंपरा असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com