पाटपन्हाळे विद्यार्थ्यांची सेंद्रिय शेतीला भेट

पाटपन्हाळे विद्यार्थ्यांची सेंद्रिय शेतीला भेट

Published on

पाटपन्हाळे विद्यार्थ्यांची
सेंद्रिय शेतीला भेट
गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वरवेली येथील एका सेंद्रिय शेतीच्या प्रकल्पाला शैक्षणिक क्षेत्रीय भेट दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान, पद्धती आणि त्याचे महत्त्व याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. या वेळी शेतकरी किर्वे यांनी विद्यार्थ्यांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व सेंद्रिय शेतीमुळे मिळणारे पोषक आणि सुरक्षित अन्न याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शेणखत निर्मिती, सेंद्रिय खते, जैविक कीडनियंत्रण या बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शेतातील फळबाग, भाजीपाला तसेच औषधी वनस्पतींचे निरीक्षण केले. पर्यावरणपूरक शेतीचे ज्ञान घेताना त्यातून उत्पन्न होणाऱ्या अन्नाच्या पोषकतत्त्वांची माहिती घेतली. मुख्याध्यापिका संदिकर यांनी शेतकरी किर्वे व त्यांचे साथीदार यांचे विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनासाठी आभार मानले व अशा अजून सकारात्मक परिणाम करणाऱ्या क्षेत्रभेटी आपण आयोजित करू, अशी हमी दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण व शाश्वत शेती यांचे महत्त्व समजले.

संगमेश्वर बसस्थानकात
हायमास्ट दिवे
संगमेश्वर ः संगमेश्वर बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले असून, स्थानक परिसरात हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. या आधुनिक प्रकाशयोजनेमुळे बसस्थानकाबाहेरील मुख्य मार्ग रात्रीच्यावेळीही उजळून निघाला आहे. बसस्थानक परिसरातील सुरक्षितता आणि वाहतूक सुविधा लक्षात घेऊन हायमास्ट दिवे लावले आहेत. बसस्थानक परिसरात स्वच्छता, बसथांबे, प्रतिक्षाकक्ष, शौचालये अशा विविध सुविधा विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बसस्थानकाचा कायापालट करण्याचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रकाशमय वातावरण उपलब्ध करून देणे हा होता. येथील हायमास्ट दिवे संपूर्ण परिसर उजळून टाकत असून रात्रीही प्रवाशांना आता कोणतीही अडचण भासत नसून बसस्थानकात थांबणे सुरक्षित वाटत आहे.

सायले-काटवलीत
बीएसएनएल सेवा खंडित
देवरूख ः सायले-काटवली पंचक्रोशीतील भारत संचार निगमचे ग्राहक अक्षरशः नेटवर्क असुविधेमुळे त्रस्त झाले आहेत. सद्यःस्थितीत सर्व शासकीय व्यवहार, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने नेटवर्क असुविधेमुळे सर्व यंत्रणा ठप्प असतात. भारत संचार निगमच्या सुमार दर्जाच्या सेवेत सुधारणा अपेक्षित आहेत अन्यथा ग्राहकांच्या असंतोषाला सामोरे जाण्याची तयारी संबंधित विभागाच्या अधिकारीवर्गाने ठेवावी, असे पंचक्रोशीतील भारत संचार निगमच्या ग्राहकांनी निक्षून सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com