आमच्या संतापाचा उद्रेक होऊ देऊ नका
swt1128.jpg
90920
मालवणः येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
आमच्या संतापाचा उद्रेक होऊ देऊ नका
पारंपारिक मच्छिमारांचा इशारा; परप्रांतीय ट्रॉलर्सप्रश्नी मालवणात मत्स्य अधिकारी धारेवर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरु असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याबाबत आज पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. आजपर्यंत अनधिकृत मासेमारीवर केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, मालवणसाठी मासेमारी परवाना अधिकारी नियुक्त करावा, परप्रांतीय तसेच स्थानिक पर्ससीन नौकांवरही कारवाई व्हावी अशा विविध मागण्या यावेळी मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने करत आज केवळ शांतपणे समज देत आहोत. मात्र, या मागण्या पूर्ण न झाल्यास तसेच कारवाईचे प्रमाण न वाढल्यास पारंपरिक मच्छिमारांच्या संतापाचा उद्रेक होईल, त्यास मत्स्य विभाग जबाबदार राहील, असा आक्रमक इशारा देण्यात आला.
जिल्ह्याच्या समुद्रात सध्या पर्ससीन नेट नौका, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स यांचा धुमाकूळ सुरु आहे. अनधिकृत मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमार सातत्याने आवाज उठवत असून कारवाईची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाकडून दोन दिवसापूर्वी येथील समुद्रात अनधिकृत मासेमारी करणारे रत्नागिरीचे तीन पर्ससीन ट्रॉलर्स पकडले. मात्र तरीही पर्ससीन व मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा हैदोस सुरु असल्याने पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मच्छिमार नेते छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, रश्मीन रोगे, जगदीश खराडे, हेमंत मोंडकर, सुजित मोंडकर, सचिन तारी, रवि कोचरेकर आदी उपस्थित होते. तीन पर्ससीन नौका पकडल्या तरी स्थानिक पर्ससीन नौकांचा धुमाकूळ सुरूच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही पर्ससीन परवाना नसताना या नौका पर्ससीन मासेमारी करतातच कशा? त्यांना कोणाचे अभय आहे? स्थानिक नौकांवर कारवाई का केली जात नाही? मत्स्य अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती श्री. सावजी, श्री. घारे व श्री. जोगी यांनी करत स्थानिक पर्ससीन नौकांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले. तसेच मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळही सुरूच असून त्यांच्याकडून होणाऱ्या अतिरेकी मासेमारीमुळे येथील समुद्रातील मत्स्य साठे संपत चालले आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे, असेही यावेळी मच्छिमार प्रतिनिधींनी सांगितले.
यावेळी मच्छिमार प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित अधिकाऱ्यांनी मालवण तालुक्याचे मासेमारी परवाना अधिकारी पद रिक्त आहे. मालवणचा कार्यभार वेंगुर्ला परवाना अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगितले. यावर मच्छिमार शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत मालवणसारख्या महत्वाच्या ठिकाणी परवाना अधिकारी नसणे हे दुर्दैव आहे, अशी टीका करत लवकरात लवकर मालवणसाठी परवाना अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी केली.
चौकट
पकडलेल्या नौका मालवणातच ठेवा
येथील समुद्रात पकडलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौका मालवण बंदरात न ठेवता देवगड बंदरात का ठेवण्यात आल्या? मालवण हे महत्वाचे बंदर असताना यापूर्वीही असे प्रकार मत्स्य विभागाने केले आहेत. यापुढे मालवण तालुक्याच्या सागरी हद्दीत पकडलेल्या नौका मालवण बंदरातच उभ्या कराव्यात. अलीकडच्या काळात अनधिकृत मासेमारी प्रकरणी ज्या कारवाया केल्या त्याचा लेखाजोगा सोमवार (ता. १५) पर्यंत आम्हाला द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.