बरणीत तोंड अडकलेल्या श्वानाची सुटका

बरणीत तोंड अडकलेल्या श्वानाची सुटका

Published on

91095

बरणीमध्ये तोंड अडकलेल्या
श्वानाची १७ दिवसांनी सुटका

मंगेश तळवणेकरांची भूतदया

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः गणेश चतुर्थीच्या दिवशी तहानेने व्याकुळलेल्या एका भटक्या कुत्र्याने प्लास्टिकच्या बरणीतून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे तोंड बरणीत अडकले आणि तो तब्बल १७ दिवस यातून सुटू शकला नाही. निरवडे-कोनापाल येथील ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही तो प्रत्येकवेळी पळून जात असल्याने सर्वजण हतबल झाले होते. अखेर विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्या पुढाकाराने वनखात्याच्या रॅपिड रेस्क्यू टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या कुत्र्याची सुटका केली.
श्री. तळवणेकर यांनी वनखात्याच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे बबन रेडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कुत्र्याच्या गळ्यात गोल वायझर अडकवून त्याला पकडण्यात आले. त्यानंतर बरणी कापून त्याची सुटका केली. या यशस्वी बचाव मोहिमेत श्री. तळवणेकर यांच्या भूतदयाचे कौतुक होत असून ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे. या मोहिमेत मधुकर भाईडकर, भारत कोनापालकर, महेंद्र धारगळकर, वेदांत धारगळकर, राज भाईडकर, चिराग तोरसकर, साहिल कोनापालकर, संजय पांढरे, प्रणव भाईडकर, प्रमोद पांढरे आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Marathi News Esakal
www.esakal.com