क्राइम

क्राइम

Published on

अॅल्युमिनियम पट्ट्या
लागून स्वार जखमी
रत्नागिरी ः शहरातील शिवाजीनगर-एसटी स्टॉप येथून दुचाकीवरून अॅल्युमिनयम पाईप घेऊन साळवी स्टॉपच्या दिशेने जाणारा स्वार अचानक थांबला. त्यामुळे पाठीमागून येणारी दुचाकी आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराला अॅल्युमिनियमच्या पट्ट्या लागून दुखापत झाली. उपचारासाठी स्वाराला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पवन अमित साळुंखे (२०, रा. जुनी तांबटआळी, रत्नागिरी) असे अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जखमी पवन साळुंखे हा दुचाकीने जयस्तंभ ते टीआरपी असा जात होता. शिवाजीनगर एसटी स्टॉप येथे आला असता त्याच्यापुढे जाणारी दुचाकीवरील दोघे खांद्यावरून अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या घेऊन जात होते. त्यातील स्वार शिवाजीनगर एसटी स्टॉप ते साळवीस्टॉप असा जात असताना अचानकपणे थांबले. त्यामुळे मागून येणाऱ्या पवनच्या दुचाकीची त्यांना धडक बसली. यात त्या अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या पवन साळुंखेच्या तोंडाला लागल्यामुळे तो जखमी झाला. पवनला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.


रिक्षाचालकास मारहाण
पावस ः ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस,’ असे विचारून लोखंडी वस्तूने डाव्या डोळ्यावर दुखापत करणाऱ्या संशयितांविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर जगन्नाथ जाधव (वय ४२, रा. नाखरे, खांबडवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास पावस एसटी बसस्थानक येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद प्रभाकर रांगणकर (वय ४०, रा. सध्या तांबळवाडी, पावस. मुळ रा. गणेशगुळे, रत्नागिरी) हे रिक्षाचालक असून, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रिक्षा घेऊन बसस्थानक रस्त्यावर आले असता संशयित समीर जाधव याने तू माझ्याकडे रागाने का बघतोस, असे बोलून रिक्षातील छोटी लोखंडी वस्तूने मारहाण करून शिवीगाळ आणि धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी आनंद रांगणकर जखमी झाले. त्यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित समीर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आईच्या खूनप्रकरणी
मुलाला अखेर अटक
रत्नागिरी ः शहरातील सुपलवाडी येथील मुलाने आईचा गळा चिरून खून करून स्वतःच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. बुधवारी (ता. १०) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. अनिकेत शशिकांत तेली (वय २५) असे संशयिताचे नाव असून, त्याने २६ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास आई पूजा तेली (वय ४५) यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला होता. गुन्हा केल्यानंतर अनिकेतने स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. १९ दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी दुपारी तो रुग्णालयातून सुटला. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याची अटक नोंदवली आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

विषारी द्रव पिलेल्या
वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः मुर (ता. राजापूर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून विषारी द्रव पिले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जनार्दन नारायण पाथरे (वय ६०, रा. मूर, ता. राजापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाथरे यांनी आजाराला कंटाळून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. मंगळवारी (ता. ९) त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.

दुचाकी घसरल्याने
दोघे जखमी
रत्नागिरी ः मुंबईहून श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या तरुण-तरुणीचा गणपतीपुळे रस्त्यावरील एका हॉटेलसमोर दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नीतेश शिर्के (वय २७) व संध्या आखा़डे अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास गणपतीपुळे येथील हॉटेलसमोरील रस्त्यावर घडली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com