होर्डिंग काढल्याने शिवसैनिक आक्रमक

होर्डिंग काढल्याने शिवसैनिक आक्रमक
Published on

91146


होर्डिंग हटविल्याने शिवसैनिक आक्रमक

दोडामार्गमधील प्रकार; नगरपंचायत अधिकाऱ्यांकडून दिलगिरी

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ ः शहरात आमदार दीपक केसरकर यांचे उभारण्यात आलेले होर्डिंग काढल्याने संतप्त बनलेल्या शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला. अखेर जाहिरात विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत पिरणकर यांनी दिलगिरी व्यक्त करीत जाहिरात शुल्क भरणा करण्याचे लेखी पत्र दिले व काढलेले होर्डिंग पुन्हा बसविण्याचे आश्वासन देताच संतप्त कार्यकर्ते शांत झाले. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली.
शहरात आमदार केसरकर यांचे होर्डिंग्स काही दिवसांपूर्वी नगरपंचायत प्रशासनाने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून काढून नेले. तर तहसील कार्यालयासमोरील लोखंडी फ्रेम काढली होती. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. याचा जाब विचारण्यासाठी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, सूर्यकांत गवस, बाळा नाईक, प्रेमानंद देसाई, संदीप गवस यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने जाहिरात विभागाचे प्रमुख पिरणकर व इतर अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला. कोणत्या कारणामुळे हे होर्डिंग तुम्ही अनधिकृत ठरवलात, असा प्रश्न उपस्थित करताच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे होर्डिंग केल्याचे पिरणकर यांनी सांगितले. मात्र, कोणत्याही प्रकारची पंच यादी घातलेली नाही, शिवाय या होर्डिंगची उंची व पृष्ठभाग हा नियमात असताना तो अनधिकृत तुम्ही कसा काय ठरविलात, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले. अखेर नगराध्यक्ष चव्हाण यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. पदाधिकारी म्हणून आम्ही कोणतीही परवानगी नाकारलेली नाही. मुळात पदाधिकाऱ्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही हा विषय प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने हाताळला आहे, असे सांगितले. अखेर प्रशासनाकडून जाहिरात कराची रक्कम भरणा करण्याचे लेखी पत्र पिरणकर यांनी दिल्यानंतर व काढलेले होर्डिंग पुन्हा बसविण्यात येतील, असे आश्वासन दिल्यावर शिवसैनिक शांत झाले.
---------------
दोन वर्षांची परवानगी दोन तासांत
दोन वर्षांपूर्वी होर्डिंगसाठी लागणारी परवानगी नगरपंचायत प्रशासनाकडे मागण्यात आली होती. त्याबाबतचे कागदपत्रही सुपूर्द केले होते. मात्र, ती अद्याप देण्यात आली नव्हती. उलट ते काढून नेण्यात आले. त्यामुळे आज शिंदे शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी या घटनेचा जाब विचारताच दोन वर्षांपूर्वी मागितलेली परवानगी दोन तासात देण्यात आली. शिवाय जाहिरात कराची रक्कम भरण्याचे पत्रही देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com