बीएसएनएलची सेवा ठप्प, अधिकारी धारेवर

बीएसएनएलची सेवा ठप्प, अधिकारी धारेवर

Published on

91221

‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प, अधिकारी धारेवर

वाडोस परिसरातील समस्या, निळेली येथे ग्रामस्थांकडून प्रश्‍नांचा भडिमार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः वाडोस परिसरात ‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प असल्याने संतप्त ग्राहकांनी निळेली एक्स्चेंज येथे दुरुस्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेले दोन दिवस वाडोस, निळेली, मोरे येथे दूरध्वनी, तसेच इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले.
निळेली एक्स्चेंज येथे आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी काल (ता. १२) रात्री ‘बीएसएनएल’ सेवेबाबत जाब विचारला. दुपारी बंद पडलेला टॉवर दुसऱ्या दिवसापर्यंत देखील सुरू होत नाही. अधिकाऱ्यांना फोन लावला तर उचलत नाहीत, अशा सर्व प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तसेच वाडोस टॉवर बंद पडला की त्यापुढील सर्व टॉवर बंद होतात. त्यामुळे सर्वच परिसराला याचा फटका बसतो, याकडे लक्ष वेधण्यात आले. सायंकाळी ५ वाजता दुरुस्त करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. या अधिकाऱ्यांना फोन करून, ‘जोपर्यंत टॉवर दुरुस्त होऊन बीएसएनएल सेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत जाऊ देणार नाही,’ असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. यावेळी योगेश ऊर्फ भाई बेळणेकर, आर. के. सावंत, संतोष सावंत, सागर जाधव, देवेंद्र भीतये, सूर्या धुरी, दिनेश शिंदे, उमेश म्हाडगुत, राजेश डिगे, बाबा निकम, भाई पालकर, दिनेश सुभेदार, श्री. रेगडे, प्रवीण सावंत, मनीष वाळके, अमोल कदम, संकेत सावंत, समीर सावंत, गंगासागर धुमक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
-------
लेखी आश्वासनानंतर अधिकाऱ्यांना सोडले
अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे होऊन या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांकडून, लेखी स्वरुपात टॉवर तसेच नेटसंदर्भात ‘बीएसएनएल’ कंपनीकडून आपल्याला कुठल्याही प्रकारची यंत्रणा, तसेच बंद पडलेल्या वस्तू नवीन मिळत नाहीत. वीजपुरवठा खंडित झाल्यावर टॉवर सुरू राहण्यासाठी ज्या बॅटरी पाहिजे असतात, त्याही मिळत नाहीत. वारंवार कळवूनही अत्यावश्यक यंत्र सामग्री मिळत नाही, असे लिहून घेतले. तब्बल तीन ते चार तास ग्रामस्थ टॉवरजवळ होते. जोपर्यंत सेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही आणि अधिकाऱ्यांनाही जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर लेखी आश्वासनानंतर अधिकाऱ्यांना सोडण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com