पान एक-सैरभैर ''ओंकार''चा दहा गावांत धुडगूस

पान एक-सैरभैर ''ओंकार''चा दहा गावांत धुडगूस

Published on

swt1323.jpg व swt1324.jpg मध्ये फोटो आहे.
91309, 91308
नेतर्डे ः ओंकार टस्कराच्या तांडवामुळे ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण आहे.

सैरभैर ‘ओंकार’चा दहा गावांत धुमाकूळ

हत्तींची नवी दहशत; मार्ग बदलत गाठले नेतर्डे

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ : सैरभैर झालेल्या ओंकार या टस्कराने एका रात्रीत अनेक गावे पायाखाली घालत तालुक्यात धुमाकूळ घातला. त्याने आपला मुक्काम सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल या गावात हलवला. दीर्घ काळानंतर दोडामार्ग तालुक्याची सीमा हत्तीने ओलांडल्यामुळे दहशतीचे नवे सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय आणखी पाच हत्तींचा कळप घोडगे येथे धुडगूस घालतच आहे.
हत्तींचा कळप सर्वसाधारणपणे ऑगस्टमध्ये कर्नाटककडे परततो. यंदा मात्र जिल्ह्यात असलेल्या सहा हत्तींच्या कळपाने आपला मुक्काम कायम ठेवला आहे. या कळपापासून गेले काही दिवस वेगळा फिरणाऱ्या ओंकार या टस्कराने एका रात्रीत कित्येक एकर शेती पायदळी तुडवत धुमाकूळ घातला. नवा मार्ग शोधत त्याने थेट गोव्याच्या हद्दीपर्यंत मजल मारली. त्याची भरदिवसादेखील भ्रमंती सुरू असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे.
या सहाही हत्तींचा गेली काही वर्षे दोडामार्ग तालुक्यातच उच्छाद चालू आहे. मागील महिन्यात या कळपाने तळकट, कुंब्रल, कोलझर, शिरवल, झोळंबे गावांत थैमान घातले होते. शेतकऱ्यांच्या बागांचे अतोनात नुकसान केले होते. कोट्यवधींची हानी केल्यानंतर हा कळप पुन्हा केर, मोर्लेच्या दिशेने आला होता. गेला महिनाभर या दशक्रोशीत सहाही हत्तींचा नुकसानीचा खेळ सुरूच आहे. हत्तींच्या या त्रासामुळे येथील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. चारच दिवसांपूर्वी घोटगे गावात पानशीचा डोंगर येथील बागायतीमधील नारळाची झाडे, बांबूची बेटे, बागायतीच्या सभोवताली असलेले सौरऊर्जेचे कुंपण तोडत हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या कळपात तेव्हा लहान मादी, मोठी मादी, दोन पिल्ले व गणेश हा टस्कर अशा पाचजणांचा समावेश होता. त्यांचा वावर सध्या घोटगे येथील कवठीच्या डोंगराळ भागात आहे.
या कळपाचा भाग असलेला ओंकार हा टस्कर मात्र गेले काही दिवस एकटा फिरत आहे. तो दोन दिवसांपूर्वी केर निडलवाडी येथे पोहोचला. तो पुन्हा कोलझरच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवली जात होती. काल (ता. १२) तो शिरवल धरण परिसराच्या वरच्या भागात आला. तेथून त्याने अचानक मार्ग बदलत भिकेकोनाळ गाठले. तेथे थोडेफार नुकसान करून तो गोव्याच्या दिशेने रवाना झाला. कालपासून त्याने मोर्ले, केर, निडलवाडी, शिरवल, भिकेकोनाळ, कळणे, फोंड्ये, करमळी, डोंगरपाल, डिंगणे व नेतर्डे अशा गावांतून जात धुमाकूळ घातला. रात्रभर त्याचे हे तांडव सुरूच होते. हत्तीला वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाचे गस्ती पथक आणि स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करत होते. या प्रवासात त्याने अनेकदा मुख्य रस्ता, वस्ती यातूनही प्रवास केला. अगदी दिवसाढवळ्याही त्याचा हा धुडगूस सुरू होता. करमळी येथून गोव्याची हद्द अगदी जवळ आहे. आज सायंकाळी उशिरा त्याचा मुक्काम धनगरवाडी-नेतार्डे येथे होता. हे ठिकाण सावंतवाडी तालुक्यात व गोव्याला लागूनच आहे. यामुळे वनविभागाची तारांबळ उडाली आहे. त्यांनी डोंगरपाल, डिंगणे, नेतर्डे या गावांत स्पीकरद्वारे नागरिकांना हत्तींपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
.......................
चौकट
सावंतवाडी तालुक्यात ‘एन्ट्री’
अलीकडच्या काही वर्षांत हत्तींनी दोडामार्ग तालुक्यातच मुक्काम ठोकला होता. यात तालुक्यातील शेतकऱ्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान केले आहे. याआधी काही वर्षांपूर्वी हत्ती सावंतवाडी शहरासह तालुका पार करून माणगाव खोऱ्‍यात स्थिरावले होते. बऱ्‍याच काळानंतर ओंकार या टस्कराने सावंतवाडी तालुक्याची हद्द गाठली आहे. त्याने आज डोंगरपाल हे तालुक्याच्या सीमेवरील गाव ओलांडत नेतर्डे गाठले. हे ठिकाण एका बाजूने गोव्याला लागून, तर दुसऱ्‍या बाजूने बांद्याच्या अगदी शेजारी आहे. यामुळे वनविभागाची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com