दापोली -हर्णै समुद्रकिनारी पर्यटकांची स्टंटबाजी सुरूच
९१२९२
हर्णै समुद्रकिनारी पर्यटकांची स्टंटबाजी सुरूच
कडक कारवाईची मागणी ः शनिवारीही धोकादायक कसरती
दापोली, ता. १३ : तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी जीप उलटल्याची घटना ताजी असतानाच हर्णै समुद्रकिनारी पर्यटकांकडून गाड्या घेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. शनिवारी (ता. १३) सकाळी काही पर्यटकांनी आपल्या गाड्या थेट पुळणीवर नेऊन धोकादायक कसरती केल्या. या प्रकारामुळे अपघातांचा धोका वाढत असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
कोकणातील पावसाळा ओसरताच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. विकेंडच्या दिवशी मोठ्या संख्येने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांतील पर्यटक दापोली किनारपट्टीकडे आकर्षित होत आहेत. दाभोळ ते केळशीपर्यंतचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, थंड वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे दापोली हे लोकप्रिय पर्यटन केंद्र ठरले आहे. मात्र, काही पर्यटकांचा बेफिकीरपणा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
समुद्रावर गाड्या नेऊन स्टंटबाजी करणे, पाण्यात पोहण्याचा अतिरेक करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नुकतीच कर्दे येथे थार गाडी उलटून गंभीर अपघात टळला होता. त्यामुळे ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा दल, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रशासनाने किनाऱ्यावर सूचनाफलक लावले असले तरी त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे वारंवार गंभीर घटना घडत आहेत. अशा अरेरावीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कोट
कर्दे येथील गाडी अपघातानंतर विकेंडच्या काळात संपूर्ण किनारपट्टीवर पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल. स्टंटबाजी करताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, स्थानिक प्रशासनाने समुद्रकिनारी पर्यटकांना वाहने नेण्यास अटकाव केला तरच अशा घटना रोखता येतील.
- महेश तोरस्कर, पोलिस निरीक्षक, दापोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.