सैतवडे व पटवर्धन प्रशालेने वर्चस्व
सैतवडे, पटवर्धन प्रशालेने वर्चस्व
जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा; २४ संघांचा सहभाग
सावर्डे , ता. १४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद आणि रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने डेरवण क्रीडा संकुलामध्ये झालेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सैतवडे हायस्कुलचे आणि १९ वर्षांखालील गटात पटवर्धन प्रशालेने वर्चस्व राखले. दोन्ही गटात मिळून २४ संघानी सहभाग घेतला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातून विविध शाळातून हे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने डेरवण क्रीडा संकुलचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी सुनील कोळी, रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष उदयराज कळंबे, रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती ऋतुजा जाधव उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडूचा सन्मान करीत ऍथलेटिक्स राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू कुमारी क्रांती म्हस्कर हिच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न करण्याकरता तांत्रिक कमिटी प्रमुख आणि राष्ट्रीय खेळाडू व पंच प्रथमेश रसाळ आणि सर्व पंच यानी मेहनत घेतली. अतिशय मनोरंजक चपळ, वेगवान व आनंद देणाऱ्या या डॉजबॉल खेळाच्या स्पर्धेमध्ये सर्व संघाने अतिशय चुरशीचा खेळ करून, सामन्यात सहभाग घेऊन प्रेक्षकांचे मने जिंकली.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात मुलांमध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे विजयी तर पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी उपविजयी ठरले. तृतीय क्रमांक सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूलला मिळाला. मुलींमध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे विजयी तर, सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल उपविजयी ठरले. तिसरा क्रमांक पटवर्धन हायस्कूलने पटकावला. १९ वर्षांखालिल वयोगटात मुलांमध्ये पटवर्धन हायस्कूल विजयी तर माखजन इंग्लिश स्कूल उपविजयी ठरले. तिसरा क्रमांक माध्यमिक विद्यालय वरवडेने पटकावला. मुलींच्या गटात पटवर्धन हायस्कूलने विजेतेपद पटकावले, तर माखजन इंग्लिश स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिसरा क्रमांक माध्यमिक विद्यालय वरवडेला मिळाला.