मनमोहक तरी दुर्लक्षित फुलपाखरे
rat१४p१९.jpg-
९१४२४
संगोपनासाठी अळ्या ठेवलेल्या बरण्या.
rat१४p२०.jpg
९१४२५
फुलपाखराची पहिली हवेतील झेप शीळ (ता. राजापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत अनुभवताना तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे, सुयोगा जठार, सुनिल किनरे, गजानन डांगे.
rat१४p२१.jpg-
९१४२६
ब्ल्यू मॉरमॉन राज्य फुलपाखरू
---------
इंट्रो
निसर्गाच्या विविध रंगांनी नटलेल्या कोकणात केवळ डोंगर, नद्या आणि समुद्रच नाहीत तर जैवविविधतेचा एक अमूल्य ठेवा दडलेला आहे. वेगवेगळ्या प्रजातीची आणि तेवढीच लक्षवेधी अशी आकर्षक फुलपाखरंही येथील निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावात फुलपाखरांची जैवविविधता अभ्यासकच नव्हे तर पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहेत. चिपळूण आणि राजापूर येथे उभारण्यात येणाऱ्या फुलपाखरू उद्यानातून तसेच खासगी वनक्षेत्रांमधून होणारे संवर्धन निश्चितच पर्यटनाला नवा आयाम देणार आहेत. सध्या फुलपाखरू महिन्याच्या निमित्ताने अनेक पक्षीमित्र, अभ्यासक फुलपाखरू संवर्धनाच्यादृष्टीने मंथन करताना दिसत आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात मनमोहक फुलपाखरे भिरभिरताना दिसतात. ती मनमोहक असतात; पण तेवढीच दुर्लक्षित. फुलपाखरांचे महत्त्व काय, त्यांचा आपल्या परिसरातील आढळ यांचा वेध येथे घेतला आहे.
- राजेंद्र बाईत, मुझ्झफर खान
--------------------
मनमोहक तरी दुर्लक्षित फुलपाखरे
कोकणी जैवविविधतेतील ठेवा; पर्यटनाला नवा आयाम
राजापूर तालुक्यातील शीळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. २ मधील विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर, २०१७ मध्ये प्रशाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक सुनील किनरे आणि सहकारी शिक्षक गजानन डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोषाचे संवर्धन करत ‘क्रिमसन रोज’ प्रजातीच्या फुलपाखराचा जीवनप्रवास अनुभवला होता. शाळा परिसरातील झाडांवर सापडलेल्या फुलपाखराच्या अळ्या प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवून त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन केले. त्यामध्ये संगोपन होत असलेल्या अळीच्या जीवनामध्ये रोज होणारे बदल प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. अळ्या कशा असतात, कोष कसा आणि कुठे असतो, कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखराला नेमक्या कुठल्या झाडाची पाने खाण्यासाठी लागतात, कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखराला ही पाने किती दिवसानंतर द्यावीत या संबंधित मिळालेल्या ज्ञानाची टीप्पणीही त्या वेळी विद्यार्थांनी तयार केली होती.
--------
rat१४p१५.jpg
91421
मूनमॉथ फुलपाखरू
मूनमॉथ प्रवासाच्या केल्या महत्वपूर्ण नोंदी
राजापूर येथील पक्षीमित्र आणि अभ्यासक धनंजय मराठे यांना ऑगस्ट, २०१७ मध्ये स्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडलेले मूनमॉथ (पतंग) सापडले होते. जखमी मुनमॉथ घरी आणल्यानंतर काही तासामध्ये त्याने अंडी घातली. त्यानंतर, त्यांनी घरामध्ये नैसर्गिक अधिवास तयार केला. त्या द्वारे अंड्यांपासून अळी ते फुलपाखरू असा तब्बल सुमारे चाळीस दिवसांचा मूनमॉथचा जीवनप्रवास त्यांना प्रत्यक्ष अनुभवला. फुलपाखराच्या जीवनप्रवासातील विविध टप्पे आणि बदलावांचे टिप्पण ठेवणे, त्या फुलपाखराला प्रत्यक्षात नैसर्गिक अधिवासाचा अनुभव देणे यामध्ये अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. वेळप्रसंगी तारेवरची कसरतही करावी लागली. त्यानंतरही त्यांनी फुलपाखराच्या जीवनप्रवासाच्या काही महत्वाच्या नोंदी केल्या. त्यामध्ये झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूला पतंग सुमारे तीनशे अंडी घालतात. त्यातून, सुमारे शंभर-सव्वाशे अळ्या बाहेर पडताना त्यापैकी शेवटी वीस-पंचवीस कोष तयार होतात. अंडी घातल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांमध्ये त्यातून अळ्या बाहेर पडतात. पाने खाऊन अळ्या मोठ्या होतात. त्यानंतर संपूर्ण दिवस सुस्थावस्थेमध्ये राहून झाडाची पाने एकमेकांना चिकटवून त्यामध्ये कोष बांधतात. त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये पूर्णपणे वाढ झालेले फुलपाखरू तयार होते. कोषातून बाहेर पडल्यानंतर सुमारे तीन तासामध्ये फुलपाखराची पूर्णपणे वाढ होते. अंड्यातून बाहेर आलेली अळी सर्वसाधारण तीन मिमी असते तर, पूर्ण वाढ झालेली अळी ३ ते ४.५ इंच लांबीची असते. पूर्ण वाढ झालेल्या पतंगाचे त्यानंतरचे जीवन सुमारे पंधरा दिवसांचे असते. या सार्या नोंदीचा त्यामध्ये समावेश असून, या सार्या नोंदी भविष्यामध्ये फुलपाखराच्या जीवनप्रवासाच्या अभ्यासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहेत.
--------
rat१४p१६.jpg-
91472
अॅक्टीयास ल्युना प्रजातीचा नर पतंग.
‘अॅक्टियास ल्युना’चे वास्तव्य
‘अॅक्टियास ल्युना’ हे अतिशय देखणे असलेले निशाचार प्रजातीचे ‘सँटरनिडी’ कुळातील फुलपाखरू (पतंग) राजापूरमध्ये आढळून आले होते. त्यामध्ये २०१६ मध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये नर तर, २०२१ मध्ये आडिवरे येथे मादी प्रजातीचे फुलपाखरू आढळले होते. सुमारे बारा ते पंधरा दिवसांचे जीवनमान असलेल्या या पतंगाच्या दोन पंखांमधील अंतर साधारणतः तेरा ते सोळा सेंमी असते. त्याच्या शेपटीचा रंग आणि लांबीवर तो नर आहे की, मादी याचे निदान करणे अधिक सोयीस्कर ठरते. त्याच्या पंखावर चंद्रासारखे गोल असतात. ते कलेकलेने वाढत जाऊन त्याचा पूर्ण चंद्र होतो. चंद्राची कला पूर्ण होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जातो; मात्र, ल्युना पतंगाच्या पंखावरील चंद्राची कला पूर्ण होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी जातो म्हणून त्याला ‘ल्युना मॉथ’ असे टोपणनाव पडले आहे. ल्युना मॉथ साधारणपणे आपल्या जीवनकालामध्ये सुमारे पंचवीस झाडांवर उपजीविका करतो. प्रजनन करण्यासाठी नर आणि मादी जेव्हा शारीरिकदृष्ट्या तयार होतात. मादी विशिष्ट गंध सोडतात. त्याचा दर्प वा वास साधारण चार ते अकरा किमीमध्ये राहून त्या परिसरात असलेल्या नरासोबत नंतर मादीचे मिलन होऊन नवीन प्रजाती जन्मास येते. राजापूर तालुक्यामध्ये सापडलेल्या मादी पतंगाच्या दोन पंखामधील अंतर १०.५ सेंमी., उंची १६.५ सेंमी. असल्याची नोंद झाली होती.
-----------
rat१४p१७.jpg-
91422
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयात २०१२ मध्ये सापडलेला आशियातील सर्वाधिक मोठा अॅटलॅस प्रजातीचा पतंग.
अॅटलॅस पतंगाचे वास्तव्य
दुर्मिळ प्रजाती म्हणून ओळखल्या जात असलेल्या अॅटलॅस प्रजातीच्या पतंगाचा सुमारे ५४ दिवसांचे जीवन असते. या फुलपाखराच्या मादीचा आकार नरापेक्षा कमी असतो. कोषातून बाहेर पडलेला पतंग आठ दिवसांचे जीवन जगतो. याच दिवसात त्याचे आणि मादीचे मिलन झाल्यास त्याचे प्रजनन होऊन मादी अंडी घालते. त्रिकोणी आकाराच्या असलेल्या या पतंगाच्या पंखावरील नक्षी तपकिरी रंगाची असून, पंखाच्या टोकाला डोळ्याच्या आकारासारखा ठिपका असतो. या ठिपक्यामुळे पंखाचे टोक सापाच्या आकारासारखे वाटते. या फुलपाखराची अनेक वैशिष्ट्ये असून, सापाच्या डोक्यासारखा पंखाचा आकार हे एक त्यापैकी वैशिष्ट आहे. २०१२ मध्ये शहरातील गुजराळी भागासह विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील बागेतील एका झाडावर तर, २०१६ मध्ये राजापूर तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर अॅटलॅस पतंग आढळून आला होता. आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये आढळलेल्या नर जातीच्या पतंगाच्या दोन पंखामधील अंतर २२ सें.मी. होती. तर, तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आढळलेल्या पतंगाच्या दोन्ही पंखाच्या टोकांमधील अंतर सुमारे २४ सेंमी. होते. त्यामुळे हा पतंग आशिया खंडातील सर्वाधिक मोठा पतंग असल्याचे बोलले जात आहे.
--------------
कमी पाऊस असलेले वातावरण पोषक
कमी पाऊस असलेले वातावरण पतंगाच्या वाढीसह नर-मादीच्या मिलनासाठी पोषक असते. पाऊस कमी झाल्यानंतर कोषानंतर हे पतंग बाहेर पडून त्यानंतर नर-मादी मिलन होऊन नवीन प्रजाती निर्माण होते. ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये पावसाचा जोर तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो. त्यामुळे या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी पतंगाचे कोष आढळून येतात.
------------
rat१४p१८.jpg-
N91423
फुलपाखरांचा अधिवास असलेली रोपं.
फुलपाखरांची होस्ट प्लॅन्ट
फुलपाखराच्या जीवनप्रवासामध्ये फुलझाडे अन् वनस्पतींची भूमिका महत्वाची ठरते. ज्या झाडावर अंडी घातलेली असतात त्या झाडांची पाने अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या खातात. त्यामध्ये त्यांची पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी पुन्हा स्वतःचा कोष बनवते. अशा झाडांना ‘होस्ट प्लॅन्ट’ म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये सोनचाफा, सोनटक्का, बहावा, कृष्णकमळ, उलटा अशोक, सिताफळ, पानफुटी, बदकवेल, अशोक, बोगनवेल, लिंबू, झेंडू, जिनियास, इचिनेसिया, लँटाना, काळ्या डोळ्यांच्या सुसान, सालव्हिया, फुलपाखरू तण, अॅनिस हिसॉप, उन्हाळी गोड, माऊंटन मिंट, रॅटेलस्नेक मास्टर, जो पाय वीड, पिळुकी, बेहडा, करंज, नारळ, निलकंठ, काटे अडुळसा, पळस, बाभळी, रानमेथी, कंबरमोडी, शिरीष, चित्रक, बहावा, रिठा, कापशी, वाघरी, करांदा, कजरी, दिडा, अर्जुन, ऐन, जास्वंद, तगर आदी झाडांचा समावेश आहे.
------------
फुलपाखरू उद्यानाद्वारे संवर्धन
पर्यावपण विभागातर्फे राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील माध्यमिक शाळेमध्ये सुमारे पाच वर्षापूर्वी फुलपाखरू उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. काही झाडांच्या पानांचा खाद्य म्हणून फुलपाखरू उपयोग करते. अशा पश्चिम घाटातील विविध प्रजातीच्या वनस्पतींसह स्थानिक पातळीवरील झाडांचा अभ्यास करून या फुलपाखरू उद्यानामध्ये झाडांची लागवड करण्यात आली आहे.
--------------
कुंडी येथे पाहिलेली फुलपाखरे
एगफ्लाय, ब्ल्यु मॉर्मन, कॉमन मॉर्मन, क्वेकर, नवाब, चॉकलेट पॅन्सी, लेमन पॅन्सी, लाईन ब्ल्यु, ग्रास ज्वेल, गोल्डन अॅन्जल, मॅप, एमीग्रान्ट, डार्क सेरुलियन, तामीळ येओमेन, क्लब बेक्ड, लस्कर, रस्टीक, स्पॉटेड स्मॉल फ्लॅट, डख्खन स्पॉटेड फ्लॅट, सनबिन (मेल), लाईम स्वॅलोटेल, हेज ब्ल्यु
-------
राज्य फुलपाखरू ''ब्लू मॉरमॉन'' चिपळूणमध्ये
चिपळूण हे पश्चिम घाटात वसलेले निसर्गरम्य शहर आहे. इथे फुलपाखरांसाठी आवश्यक असलेले विविध अधिवास उपलब्ध आहेत. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आल्यानंतर देवरायांमध्ये रंगबिरंगी फुलपाखरं आढळतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ''ब्लू मॉरमॉन'' हे चिपळूणमध्ये पाहायला मिळाले होते. त्यानंतर दुर्मिळ फुलपाखरांचे जतन करण्यासाठी चिपळूण पालिकेतर्फे शहरात फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा भाग असलेल्या कुंभार्लीच्या डोंगरात फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यासक येत असतात. दाभोळ खाडीकिनारीही त्यांचा आढळ आहे. आमदार भास्कर जाधव यानी २००९ मध्ये बटरफ्लाय गार्डनची संकल्पना मांडली आणि त्यासाठी निधी मंजूर केला होता. कालांतराने प्रलंबित राहिलेला हा उद्यानाचा प्रस्ताव विद्यमान मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पुढे आणला. त्यामुळेच फुलपाखरू उद्यानाच्या प्रकल्पाला गती मिळाली.
---------------------------
खासगी वनक्षेत्रात फुलपाखरू संवर्धन
रामपूर येथील नंदू तांबे या युवकाने गावात ३२ एकरचे खासगी वनक्षेत्र राखले आहे. त्या ठिकाणीही फुलपाखरूंचा वावर असतो. येथे बारमाही पर्यटक येत असतात. त्यांच्यात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या सप्टेंबरनंतर वाढते. कारण, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर फुलपाखरांचा वावर सुरू होतो. त्यामुळे अनेक पक्षी निरीक्षक शनिवार आणि रविवारच्या दिवशी रानावनात फिरतात. पिंपळी कडववाडी येथे अनिल साळुंखे यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक जंगल जपले आहे. त्या ठिकाणी फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक घेत असतात. वर्षभरात दहा ते पंधरा पर्यटक केवळ फुलपाखरांच्या निरीक्षणासाठी येतात. पेढे गावातील विलास महाडिक या शिक्षकांनी उभारलेल्या परशुराम पर्यटन केंद्रातील फुलपाखरूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षक येत असतात. पक्षी अभ्यासक बंटी गुडेकर मागील २५ वर्षापासून कोकणात आढळणारे पक्षी आणि फुलपाखरांचा अभ्यास करून त्यांची माहिती संग्रहित करण्याचे काम करत आहेत. ही माहिती ते व्याख्यानाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवत आहेत.
---------
कोट १
कोकणात मलबार बँडेड पीकॉक, तमिळ लेसविंग आणि क्रिमसन रोज या दुर्मिळ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ब्लू मॉर्मन, मलबार बॅन्डेड पीकॉक, कॉमन मॅप ही फुलपाखरे सर्वाधिक आहेत. त्यानंतर चॉकलेट पॅन्सी, लेमन पॅन्सी, ब्लू पॅन्सी यांचा क्रमांक लागतो. अलिकडच्या काळात हे फुलपाखरू चिपळूण परिसरात आढळू लागले आहेत.
- ज्ञानेश गुढेकर, पक्षी निरीक्षक, चिपळूण
------
कोट २
जिल्ह्यात आतापर्यंत १७५ विविध फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झालेली आहे. जंगलतोडीमुळे फुलपाखरांच्या अधिवासावर परिमाण होत आहे. परागीभवनामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या फुलपाखरांने संवर्धन करण्यासाठी शाळा, शहरांमधील उद्यानांमध्ये आवश्यक झाडांची लागवड केली पाहिजे. तसा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. मी स्वतः घरी तशा पद्धतीची रोपं लावली आहेत.
- प्रतीक मोरे, अभ्यासक, सह्याद्री संकल्प सोसायटी
-----
कोट ३
कोकणाला विविधांगी निसर्गसंपदा लाभलेली असून, दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचे तेथे वास्तव्य आहे. जागतिक स्तरावर महत्त्वाच्या फुलवनस्पतीही या भागात आढळतात, तसेच दुर्मिळ फुलपाखरांचाही त्यामध्ये समावेश आहे. निसर्गसाखळीमध्ये फुलपाखरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या संदर्भात जनजागृती होऊन त्यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
– धनंजय मराठे, पक्षीमित्र
-----
कोट ४
पर्यावरण सेवा योजना विभागाच्या माध्यमातून तत्कालीन प्रकल्पाधिकारी दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरामध्ये फुलपाखरू उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे विद्यार्थ्यांनी संगोपन केले आहे.
- दिनेश चौगुले, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव
----
कोट ५
कोकणात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या अभ्यासासाठी निरीक्षक ग्रामीण भागात खेडोपाडी जातात. कावीळतळी मध्ये फुलपाखरू उद्यानाला गती देण्याचे काम पालिकेने केले आहे. या ठिकाणी दुर्मिळ वनस्पती आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून फुलपाखरूंना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यातून फुलपाखरूंच्या निरीक्षणासाठी येणाऱ्यांना शहरांत एक दालन उपलब्ध होणार आहे.
- विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका
---------
(टीप- ही चौकट पानात शेवटी स्वतंत्रपणे घेतल्यास उत्तम)
चौकट
- rat१४p१२.jpg, rat१४p१३.jpg-
91418, 91419
कुंडी येथे आढळलेली फुलपाखरं.
- rat१४p१४.jpg-
N91420
कॉमन नवाब प्रजातीचे फुलपाखरू
चौकट
देवरूख, कुंडी परिसरात १४० प्रजाती ः पालकर
देवरूख जैवविविधतेने नटलेले आहे. विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरं, वनस्पतींच्या अनेकविध प्रजाती येथे बघायला मिळतात. तिथे राहणाऱ्या निसर्गमित्र प्रतीक मोरे आणि डॉ. शार्दुल केळकर या दोघांनी देवरूख आणि आसपासचा परिसर अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यांच्यामुळेच या परिसरातील जैवविविधतेची माहिती पुढे येत आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार फुलपाखरांचा अधिवास पाहण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. मी, माझा मुलगा रोहित, मंगल, सुशील आणि महेश गुजर असे आमचा ५ जणं प्रतिकला घेऊन कुंडीला जायला निघालो. देवरूखपासून साधारण १५ किलोमीटरवर कुंडी गाव, तिथून पुढे १ किलोमीटरवर एक देवराई आहे. त्या ठिकाणी कोरड्या नदीपात्रात फुलपाखराच्या मागे जाण्याचा आमचा बेत होता. ही नदी महिमतगडाच्या पायथ्याशी उगम पावते आणि कुंडी गावातून वाहते. पाणी कमी झालं की, फुलपाखरं पाणी, चिखल असेल त्या ठिकाणी mud puddling साठी येतात. त्यातून त्यांना आवश्यक ती पोषक द्रव्ये (मिनरल्स) मिळतात. त्या कुंडी भागात फुलपाखरांच्या ७८ प्रजातींची नोंद झालेली आहे. देवरूखमध्ये ११० प्रकार आणि दोन्ही ठिकाणी मिळून १४० च्या आसपास फुलपाखरं सापडतात. आम्ही नदीपात्रातून चालायला सुरवात करायच्या आधीच अनेक छोट्या-मोठ्या फुलपाखरांनी आमचं स्वागत केलं. तिथेच आमची खात्री झाली, अजून बरीच फुलपाखरं पहायला मिळतील याची. पुढे दोन ते अडीच तास आम्हाला २३ प्रकारची फुलपाखरं दिसली. ऊन चढायला लागल्यावर फुलपाखरं खूप अॅक्टिव्ह होतात. मग एका जागी क्वचित बसतात आणि फोटो काढणं कठीण होतं. दगडधोंड्यातून साधारण दीड किलोमीटर चाललो. वाटेत काही पक्ष्यांनी दर्शन दिलं. स्वर्गीय नर्तक (नर, मादी) दिसला. स्पॉटेड डोव्ह, सनबर्डस्, पेल-बिल्ड फ्लॉवरपीकर (टिकेलचा फुलटोचा), ड्रोंगो, ओरिओल, सर्प गरुड (serpant eagle), मलबार व्हिसलिंग थ्रश, ऑरेंज हेडेड थ्रश, जंगल बबर्लस्, बार्बेट वगैरे इतर पक्षी पण दिसले. आपला राज्यप्राणी शेकरूचे घर बघितले. वेगवेगळी झाडं पण बघायला मिळाली. शेवर, पळस, पांगारा, देव शेवर, कडू कवठ, ऐन, किंजळ, जंगली बदाम, जंगली उंबर इत्यादी. योग्य तो muddling spot (एखाद्या प्राण्याची २ ते ४ दिवसांपूर्वीची विष्ठा, पाणी, माती किंवा वाळू आणि ऊन हे ज्या ठिकाणी असेल असा स्पॉट) सापडला असता तर अजून काही प्रकार बघायला मिळाले असते. मात्र जी फुलपाखरं बघायला मिळाली, त्यातच आम्ही खुश होतो, असे नेत्रा पालकर यांनी कुंडी परिसर पिंजून काढल्यानंतर सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.