
दोडामार्ग लोक अदालतीत
१५५ प्रकरणांचा निपटारा
दोडामार्ग ः तालुका विधी सेवा समिती व दोडामार्ग वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालयात शनिवारी (ता. १३) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत न्यायालयीन व वादपूर्व अशा दोन्ही प्रकारातील अनेक प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. या विशेष लोकन्यायालयात एकूण १५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या ९१ प्रकरणांपैकी ३७ प्रकरणांमध्ये निकाल लागले. यामध्ये १ दिवाणी व ३६ फौजदारी प्रकरणांचा समावेश होता. या निकालांद्वारे ९० हजार रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय वाद सुरू होण्यापूर्वीच तोडगा काढण्यासाठी ठेवण्यात आलेल्या ६६४ वादपूर्व प्रकरणांपैकी ११८ प्रकरणांमध्ये यशस्वी निर्णय घेण्यात आले. यामध्ये विविध बँका, विद्युत मंडळ, ग्रामपंचायतीकडील पाणीपट्टी व घरपट्टी यांसारख्या विषयांचा समावेश होता. या प्रक्रियेमुळे एकूण ३ लाख २० हजार ३९२ इतकी रक्कम वसूल झाली. या यशस्वी आयोजनामध्ये दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) वाय. पी. बावकर, पॅनल सदस्य अॅड. बी. व्ही. नाईक, बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. विशाल नाईक, सरकारी अभियोक्ता अमित पेडणेकर, अॅड. प्रवीण नाईक आदींनी सहकार्य केले.
..........................
नागवेल लागवडीचे
केरवासीयांना धडे
दोडामार्ग ः केर चव्हाटा मंदिर परिसरात ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत नागवेल लागवडीसंदर्भातील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीतर्फे घेतलेल्या या उपक्रमात प्रगतशील शेतकरी विश्वास धर्णे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विड्याच्या पानाचा उपयोग धार्मिक विधींसह मुखशुद्धीसाठी देखील केला जातो. बाजारात विड्यासाठी प्रामुख्याने गोडसर चव असलेली नागवेलीची पाने उपलब्ध असतात. केर गावातही पारंपरिक पानवेली आढळतात; मात्र बाजारपेठेची मागणी लक्षात घेता नागवेल लागवडीकडे स्थानिक शेतकऱ्यांचा कल वळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नागवेल लागवडीसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच तेजस देसाई, ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील, सदस्य नीलेश देसाई, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोडामार्ग पोलिस कर्मचारी विजय जाधव यांनी पुढाकार घेत आपल्या साताऱ्यातील मित्राचा पानमळा ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध करून दिला. प्रगतशील शेतकरी संतोष बंडलकर यांच्या मळ्यातील नागवेली केर येथे आणल्या.
---------
आडाळी एमआयडीसी
सुरू करण्याची मागणी
दोडामार्ग ः आडाळी येथील नियोजित एमआयडीसी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आडाळी एमआयडीसी मंजूर होऊन व जमिनी खरेदी करून किमान १० वर्षे झाली, परंतु अद्याप तेथे कोणतेही उत्पादन किंवा प्रकल्प झाला नाही. येथील तरुण गोवा किंवा अन्य ठिकाणी मिळेल ती कमी पगाराची नोकरी स्वीकारत आहेत. आडाळी एमआयडीसीत वेगवेगळे उद्योग आले, तर तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांची होणारी परवड थांबेल, असे वाटत होते; परंतु एमआयडीसी सुरू होत नाही. नेमकी कोणामुळे एमआयडीसी सुरू होत नाही? यासाठी एखादी अभ्यास समिती नेमावी व उपाययोजना करण्यासाठी त्वरित हालचाल करावी. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.