आदिम कडधान्य – उडीद

आदिम कडधान्य – उडीद

Published on

जपूया बीजवारसा---------लोगो
(९ सप्टेंबर टुडे ३)

आदिम कडधान्य-उडीद
संपूर्ण भारतात पिकवले जाणारे आणखी एक महत्त्वाचे पीक म्हणजे उडीद होय. तमिळ भाषेत असलेल्या उळींदू या नावावरून मराठीत उडीद हे नाव मिळाले आहे. जमिनीवर पसरणारे हे झुडूप असून, त्याच्या खोडावर बारीक केस असतात. एकाआड एक संयुक्त पाने असलेल्या या झुडपाला झुपक्यांनी पिवळी फुले येतात. त्यालाच पुढे पाच ते सहा सेंटीमीटरच्या काळपट हिरव्या शेंगा येतात ज्यात १० ते १२ दाणे असतात. उडीद हे मुख्यत: खरीप पिकांमध्ये आंतरपिक म्हणून घेतले जाते.
- rat१५p८.jpg -
25N91625
- कुणाल अणेराव
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
-----
भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितृपक्ष म्हणजेच आपल्या मृत नातेवाईक आणि पूर्वज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अन्न-पाणी अर्पण केले जाते तसेच त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. पूर्वजांना अर्पण करावयाच्या अन्नामध्ये तांदूळ, उडीद, तीळ हे मुख्यत: वापरले जातात. आपल्या सर्व पारंपरिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये आदिमकाळापासून पिकवत आलेल्या स्थानिक अन्नधान्यांचा वापर केला जातो, असे आढळून आले आहे. त्यानुसार श्राद्धविधींमध्ये तांदूळ आणि तिळाचे पिंड बनवले जातात तर नैवेद्याला उडदाच्या डाळीचे वडे केले जातात.
उडीद गेली सात हजार वर्षे आपल्या आहार संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग बनून राहिला आहे. भारतीय उपखंडात आदिमकाळापासून आढळून येणारी कडधान्ये म्हणजे मूग, उडीद, कुळीथ, वाल, मटकी होत. उडीद आणि मूग ही कडधान्ये तर संपूर्ण भारतात वापरली जात आहेत, तर भारतात पिकणारे वाल-घेवडा-पापडी म्हणजे जैवविविधतेला लागलेले चार चांद आहेत. हरभरा, तूर आणि मसूर ही कडधान्ये भारतीय उपखंडाला लागून असणाऱ्या वायव्य आशियातून तीन हजार वर्षांपूर्वी भारतात आली आणि एक हजार वर्षांपूर्वी आहाराचा भाग बनले.
मूग, मटकी आणि उडीद या तिन्ही व्हिग्ना एकाच कुटुंबातील वनस्पती आहेत. मूग म्हणजे व्हिग्ना त्रायलोबाता-संस्कृत-मुद्गपर्णी. उडीद व्हिग्ना डालझेलिआना-संस्कृत- माषपर्णी. आधुनिक वैज्ञानिक नावात मात्र गफलत झालेली आहे. उडिदाला व्हिग्ना मुंगो तर मुगाला व्हिग्नो राडिआटा ही नावे आहेत. हा घोटाळा थोर वनस्पती शास्त्रज्ज्ञ विल्यम रॉक्सबर्ग (याला भारतीय वनस्पतीशास्त्राचा जनक मानले जाते.) याने केला जो अजूनही दुरुस्त केला गेलेला नाही.
आयुर्वेदातही सर्वश्रेष्ठ पथ्यकर म्हणून मुगाचा उल्लेख केला आहे, तर उडिदाचा उल्लेख ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या बृहदारण्यकात आणि महाभारतात आढळतो. तिथून पुढे चीन आणि मग आग्नेय आशिया मुगाने पादाक्रांत केला. चरकसंहिता-आयुर्वेद आणि मानसोल्लास यासारख्या जुन्या आहारग्रंथांमध्ये वटक म्हणजेच वडे हे सहसा उडदाच्या डाळीचे असत तर भजी ही मुगापासून बनवली जात होती. त्यानुसार वडे बनवण्याची रित पुरातन असावी हे नक्की. या पाककृती दहीवड्यांप्रमाणे आहेत; मात्र दह्याऐवजी हिंग व सुगंधी मसाले घातलेल्या ताकाचा वापर केला जात होता. मध्ययुगातील विशेष उल्लेखनीय पदार्थ म्हणजे अयालिक पिंडरी. नागवेलीच्या पानांवर उडिदाचे पीठ आणि मसाले थापून त्याची सुरळी करून उकडली जाई. मग त्याचे काप करून, तळून त्यावर इतर मसाले शिंपडले जात. ही पिंडरी आजच्या अळूवडीची पूर्वज मानली जाते. उडिदापासून बनवली जाणारी भारतीय जिलेबी ‘इमरती’ ही माषफेणिका या नावाने पुरातन वाङ्मयात आढळून येते. पुरणपोळ्या किंवा कडबूमध्ये भरावयाचे पुरणही उडदाचे बनवले जात असे त्याशिवाय इडली ही देखील पूर्णपणे उडिदाची बनवली जायची. मूग आणि उडीद या दोन्ही डाळींच्या लाडवांची परंपराही प्राचीन भारतात सर्वत्र पसरलेली दिसून येते. मूग आणि उडिदाची पेज, सूप किंवा वरण हा देखील फार जुना पदार्थ आहे. बुद्धाने आपल्या भिक्षूंना मुगाच्या सुपाची खास शिफारस केली आहे तर काश्यपानेही दोन्ही सुपांचा उल्लेख केला आहे.
दक्षिण भारतातील इडली-डोसा-मेदूवडा असो, पंजाबी माखी दाल, राजस्थानी दालबाटी, महाराष्ट्रातील घुटं, उत्तर भारतीय कचोऱ्या, बंगाली माशकलाई दाल हे सारे सुप्रसिद्ध पदार्थ उडिदाच्या डाळीपासून तयार केले जातात. शंभर ग्राम उडीद डाळीमध्ये ६० टक्के कार्बोदके, २४ टक्के प्रथिनं, १८ टक्के चोथा, त्या व्यतिरिक्त लोह, कॅल्शियम, पोटॅशियम अशी खनिजे आणि मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्व बी असते. उडीद पचायला जड असतात. त्यामुळे उडीद व्यवस्थित भिजवून आणि आंबवून खाल्ले तर त्यांची पोषणमुल्ये तर वाढतातच; पण पचायलाही हलके होतात. आयुर्वेदातही उडीद हे उष्ण, कामोत्तेजक, बलकारक, मांस आणि मेदवर्धक मानले गेले आहेत. संधीवात, पक्षाघात आणि मज्जासंस्थाच्या विकारात उडिदाच्या सेवनाने खूप फायदा होतो, असे लिहिले आहे.

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com