-देवडे गावातील जमिनी परप्रांतीयांना विकू नये
देवडेतील जमिनी परप्रांतीयांना विकू नये
‘सोमलिंग क्लब’चे निवेदन ः ग्रामपंचायतीने ठराव करावा
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १५ ः संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावामधील जमिनी परप्रांतीय लोकांना विकू नयेत, असा ठराव ग्रामपंचायतीत मंजूर करावा, असे निवेदन देवडे गावातील चिंचवलकर वाडीतील नवतरुणांचे सोमलिंग स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला देण्यात आले.
कोकणात वाढणारे पर्यटन, त्यातून मोठ्या प्रमाणावर कोकणात परप्रांतीय जमीन खरेदी करत आहेत. देवडे गावचे निसर्गरम्य सौंदर्य तसेच गावातून विशाळगड पायवाट किंवा रस्ता तयार झाला तर गावात शिवप्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढेल, गावातील जमिनींचे महत्व वाढेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. गावच्या जडणघडणीसाठी, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि विकासाची दिशा स्थानिकांच्या हाती राहण्यासाठी हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. असा विचार करून महत्वपूर्ण सूचना सोमलिंग स्पोर्ट्स क्लब देवडेच्या सदस्यांनी देवडे सरपंच विलास कांगणे यांना निवेदन दिले आहे.