कुडप फाटा परिसरात प्रचंड खड्डे

कुडप फाटा परिसरात प्रचंड खड्डे

Published on

-rat१५p१७.jpg-
२५N९१६४३
सावर्डे : डेरवणफाटा ते डेरवण हॉस्पिटल मार्गावर कुडपफाट्याजवळ रस्त्याची झालेली दुरवस्था.
----
कुडपफाटा परिसरात प्रचंड खड्डे
वाहतुकीला अडथळे : अपघाताचा धोका
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १५ : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील डेरवणफाटा ते डेरवण हॉस्पिटल या मुख्य मार्गावर विशेषत: कुडपफाटा परिसरात प्रचंड खड्ड्यांमुळे रस्ता खराब झाला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे
सावर्डे-डेरवण रस्ता हा गावातील महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. हाच रस्ता डेरवण हॉस्पिटल, शाळा, बाजार आणि राष्ट्रीय महामार्गाशी जोडतो; परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले नसल्याने व पावसानंतर कुडपफाटा आणि त्यापासून काहीशा मीटर अंतरावर रस्ता ठिकठिकाणी खड्डेमय झाला आहे. फुटलेला डांबरी पृष्ठभाग, गायब झालेल्या बाजूपट्ट्या आणि पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. या भागातून सकाळ-सायंकाळ शाळेचे विद्यार्थी, हॉस्पिटलला जाणारे आजारी आणि व्यावसायिक मालवाहतूक यांचा वारंवार प्रवास होतो. खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान, सायकल व दुचाकी अपघात व रुग्णवाहिकांना विलंब होण्याचा धोका वाढला आहे.
स्थानिक रहिवासी व वाहनचालक सांगतात, अनेकदा गाड्यांचे टायर फाटणे, गाडीची मोडतोड होणे ही सामान्य घटना बनली आहे. खासकरून रात्रीची वाहतूक अधिक धोकादायक ठरते. कारण, खड्ड्यात पाणी साचल्यावर खड्ड्याची खोली दिसत नाही. कोकणातील वार्षिक पावसामुळे तसेच वाढलेल्या रहदारीमुळे रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. या रस्त्यावर डेरवणफाट्याच्या सुरुवातीस रस्ता उखडला आहे. कुडपफाट्याजवळ मरिआई मंदिराच्या रस्त्यावरून प्रचंड पाणी या मुख्य रस्त्यावर येते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची प्रचंड धूप होत आहे. स्वप्नल बिल्डिंग क्रमांक तीन व वरदायिनी हॉटेलसमोर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डेरवण हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर पूर्ण रस्ताच उखडला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com