कोकण किनाऱ्यावर चार नव्या जेट्टी

कोकण किनाऱ्यावर चार नव्या जेट्टी

Published on

कोकण किनाऱ्यावर आता चार नव्या जेटी उभारणार
सीआरझेडची परवानगी; पर्यटन, मासेमारी व्यवसायाला मिळणार चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरण (एमसीझेडएमए)कडून सीआरझेड (CRZ) संदर्भात मंजुरी मिळाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी (ता. राजापूर), उटंबर (ता. दापोली) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर यांचा समावेश आहे. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत.
​कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे (वाहने घेऊन जाणारी जहाजे) यांना सुरक्षितपणे थांबता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोईस्कर होणार आहे. कोकणचा माणूस पिढ्यानपिढ्या बोटीने प्रवास करत मुंबई गाठायचा. केवळ १०-१५ रुपयांमध्ये भाऊच्या धक्क्यावर उतरून मुंबई शहरात पोहोचणे शक्य होत होते. प्रवासाचा हा मार्ग बंद झाल्यानंतर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता लवकरच या चार नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टी पुन्हा एकदा गजबजणार आहे. या व्यतिरिक्त, आणखी दोन जेटींची कामेही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण ४ नव्या जेटी कोकणच्या विकासाला हातभार लावणार आहेत. ​
या विकासकामांमुळे केवळ मासेमारी आणि पर्यटनच नाही तर संपूर्ण कोकणच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळेल तसेच, स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरीमार्गाने जोडले जातील, ज्यामुळे प्रवासखर्च आणि वेळ दोन्हींची बचत होईल. प्रशासनाकडून या प्रकल्पांना लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. यानंतर कोकणातील सागरी किनारा पुन्हा एकदा प्रवाशांनी आणि व्यवसायांनी गजबजून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com