सावंतवाडीत सफाई कामगारांचे ‘काम बंद’

सावंतवाडीत सफाई कामगारांचे ‘काम बंद’

Published on

91671

सावंतवाडीत सफाई कामगारांचे ‘काम बंद’

पीएफ प्रश्नी आक्रमक; माजी नगराध्यक्ष साळगावकरांकडून पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. १५ ः येथील पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून पालिका कार्यालयासमोर ‘काम बंद’ आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संबंधित कंत्राटदाराने गेल्या चार वर्षांपासून सुमारे ६५ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) बुडवल्याचा आरोप करत कामगारांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाठिंबा देत उपोषणात सहभाग घेतला आहे.
​यावेळी संतप्त सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी आमच्या हक्काचा, कामगार एकजुटीचा विजय असो, आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. ढोल वाजवून त्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. ​कामगारांनी प्रशासनासमोर ठेवलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ​पीएफ बुडवल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला तात्काळ नोटीस बजावून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, ​मागील चार वर्षांची थकीत पीएफ रक्कम ठेकेदाराकडून वसूल करून ती त्वरित कामगारांच्या खात्यात जमा करावी, ​कामगारांना किमान वेतन लागू करून समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे तसेच ​वेतन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अदा करावे. ​नवीन सरकारी निर्णयानुसार नवीन निविदा (टेंडर) तात्काळ काढण्यात यावी. ​नवीन निविदा काढण्यासाठी १८ महिन्यांचा विलंब का झाला, याची चौकशी करून या विलंबातील नुकसानाची भरपाई कामगारांना मिळावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाला श्री. साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश‌ भोगटे, अफरोज राजगुरू, पुंडलिक दळवी, रवी जाधव, राजू बेग, उमेश खटावकर, जॉनी फर्नांडिस, सचिन माडग आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असून ६० सफाई कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
--------------------
कामगारांना न्याय मिळेपर्यंत माघार नाही
या आंदोलनाबाबत माजी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, ‘‘पालिका प्रशासनाकडून परिसर करार पद्धतीने सफाई कामगारांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले असताना आज हेच प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहेत. तसेच काम बंद आंदोलन केल्यास प्रसंगी कामावरून काढून टाकण्याची धमकी देत आहेत. हा प्रकार चुकीचा असून कामगारांना न्याय मिळेपर्यंत मी माघार घेणार नाही. आज १२ हजार रुपयांच्या रकमेवर कंत्राटी कामगारांची सही घेतली जात आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यांना ९५०० एवढाच पगार दिला जातो हा सुद्धा अन्याय असून त्यांचा भविष्य निर्वाह निधी त्यांना मिळालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे कामगारांना न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.’’
-------
आंदोलनावर ठाम
या गंभीर विषयावर पालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे. जोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर कामगार ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com