‘ज्ञानगुच्छा’मुळे कातकरी मुलांच्या शिक्षणाला नवा सुगंध
लोगो ः काही सुखद
----------
91691
‘ज्ञानगुच्छा’मुळे कातकरी मुलांच्या शिक्षणाला नवा सुगंध
सीईओंच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पुष्पगुच्छाऐवजी स्वीकारलेल्या वह्या सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः स्वागतासाठी फुलांऐवजी ज्ञानाची भेट द्या, अशा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या आवाहनाला दालनात येणाऱ्या जिल्ह्यातील अभ्यागतानी उत्तम प्रतिसाद दिला. पुष्पगुच्छ नाही, तर वह्यांच्या रूपाने ज्ञानगुच्छ दिला. यातून जमा झालेल्या वह्या वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) गावातील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना भेट दिल्या गेल्या. सीईओंच्या या उपक्रमातून कातकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवा सुगंध मिळाला आहे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक असे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जिल्ह्यात नव्याने हजर झाल्यावर जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय व्यक्ती आणि सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी येत असतात. या अधिकाऱ्यांच्या दालनात आल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करीत असतात. मात्र, स्वागत केल्यानंतर त्या पुष्पगुच्छाचे कर्तव्य संपते. मग तो कोपऱ्यात पडलेला असतो. काही तासांनी त्याची गणना कचऱ्यात केली जाते. त्यासाठी खर्च केलेले शेकडोंनी रुपये व्यर्थ जातात. त्या ऐवजी अलीकडे झाडाचे रोपटे देण्याची नवीन प्रथा आली आहे. ते रोप लावल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. त्यामुळे हा एक नवीन ट्रेंड निर्माण झालेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत फेब्रुवारी २०२५ मध्ये हजर झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी या सर्वांचे पलीकडे जात आपल्यातील सृजनशीलता दाखविली. भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींनी पुष्पगुच्छ न आणता गोरगरीब मुलांना उपयोगी पडतील, अशा शैक्षणिक वह्या घेऊन येण्याचे आवाहन केले होते. या आगळ्या वेगळ्या ‘फुलांचे ऐश्वर्य नव्हे, शिक्षणाची भेट खरी’ या उपक्रमाला भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ‘स्वागत वह्यांनी, लाभ विद्यार्थ्यांना’ हा खेबुडकरांचा उपक्रम चांगलाच गाजला.
भेटीच्या स्वागतातून जमा झालेल्या वह्या आणि पुस्तके श्री. खेबुडकर यांनी काल (ता.१४) वेताळ बांबर्डे गावातील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना भेट दिल्या. यावेळी खेबुडकर स्वतः उपस्थित होते. यातून खेबुडकर यांच्यातील शैक्षणिक दृष्टिकोन दिसून आला. त्या वह्या संस्थेला पाठवून न देता स्वतःच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना देण्याचे मोठेपण सुध्दा त्यांनी दाखविले. यावेळी संस्थेचे प्रमुख उदय आईर हे सुध्दा उपस्थित होते. भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना फुलांऐवजी शिक्षणाचा सुवास देण्यासाठी राबविलेला उपक्रम निश्चितच जिल्ह्यातील अन्य अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांनी राबविणे गरजेचे आहे.
--------------
इतरांनीही प्रेरणा घ्यावी
जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी, राजकीय व्यक्ती यांच्याजवळ अशाप्रकारे संकल्पना राबविल्यास वर्षभरात हजारोंनी वह्या संकलित होतील. त्या वह्या जूनमध्ये जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वितरीत करता येतील. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचे वेगळे उपक्रम राबविण्याची गरज पडणार नाही. परिणामी फुलांच्या वापराने पर्यावरणाचे होणारे नुकसान सुध्दा थांबेल. तसेच पुष्पगुच्छा ऐवजी ज्ञानगुच्छ दिल्याने गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलेल. त्यामुळे शिक्षणाला नवा सुगंध प्राप्त होईल.
---------------
कोट
आजच्या जमान्यात शिक्षण महत्त्वाचे आहे. मग ती मुले कोणत्याही घटकातील असुदेत. शासनानेही मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांना शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या मिळत नाहीत. त्यामुळे आपण भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना पुष्पगुच्छ आणि नका. त्या ऐवजी वह्या भेट द्या, असे आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेल्या वह्यांचे वाटप आपण कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना केले आहे.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद