-बाजारपेठेतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
पावस बाजारपेठेतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
वाहनचालकांची गैरसोय ; प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः सतत पडणाऱ्या पावसामुळे पावस बाजारपेठ मार्गावरील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरून गेल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. अचानक वाहन खड्ड्यात गेल्यामुळे चालकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वयोवृद्धांची तर मोठीच अडचण झालेली आहे. या मार्गावरून वाहने चालवणे धोकादायक ठरत असून, पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.
पावस बाजारपेठ मार्ग अरूंद असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याकरिता गटारे नसल्यामुळे दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असते. पावसाळ्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजवण्याचे काम केले जाते; परंतु हा प्रकार दरवर्षी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्याचे डांबरीकरण केले जाते; पण वर्षभरामध्ये पुन्हा खड्डे पडतात. तिथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी निवडणुकीच्यावेळी केली जाते. लोकप्रतिनिधीही काँक्रिटचे रस्ते बनवून देतो, असे आश्वासन देऊन निघून जातात; मात्र प्रत्यक्षात तिकडे दुर्लक्ष होते. मे महिन्यात रस्त्याची कामे न केल्यामुळे यंदाही पावसवासियांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवात खड्ड्यांवर मलमपट्टी करण्यात आली. त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे मलमपट्टीचा काहीच उपयोग झाला नाही. पुन्हा मोठमोठे खड्डे पाण्याने भरलेल्या अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध जैसे थे आहेत. त्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. हे खड्डे भरा अन्यथा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
पावस हे पर्यटनस्थळ आहे. दिवाळी, मे महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. गणेशोत्सव पूर्ण झाला आहे. दसरा, दिवाळीचे वेध लागलेले आहेत. त्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक पावस परिसरात येण्यास सुरुवात होईल. त्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. पावसाळा थांबल्यावर तातडीने हे खड्डे भरावेत, अशी मागणी केली जात आहे.
-----
कोट
पाच वर्षांपूर्वी या बाजारपेठ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी रस्त्यावरती खड्डे पडत आहेत. तात्पुरती मलमपट्टी केली जाते, त्यावर ठोस उपाय केले जात नाहीत. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले तर निश्चितच खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा उद्भवणार नाही.
- मंगेश भाटकर, पावस