रत्नागिरीचा गायक चैतन्य परबला
rat१६p२१.jpg-
९१८९१
चिंचवड : रत्नागिरीचा गायक चैतन्य परब याला (कै.) नितीन रानडे पुरस्कार प्रदान करताना मंदार देव महाराज. सोबत डॉ. रवींद्र घांगुर्डे, स्मिता रानडे.
रत्नागिरीचा गायक चैतन्य परबला
नितीन रानडे पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि नादब्रह्म परिवारातर्फे आयोजित संकष्टी चतुर्थी संगीत सभेत रत्नागिरीतील युवा गायक चैतन्य परब याचे सुश्राव्य गायन झाले. या प्रसंगी चैतन्यला रसिकाग्रणी (कै.) नितीन रानडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यातील मोरया मंदिरात कार्यक्रम झाला.
स्मृती पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. हा पुरस्कार चैतन्यला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, स्मिता रानडे प्रमुख उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि ५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चैतन्यने संगीताचे सुरवातीचे शिक्षण आई विनया परब यांच्याकडे घेतले. गेली १० वर्षे तो किराणा घराण्याचे नामवंत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय संगीताची प्रगत तालीम घेत आहे.
चैतन्यने मैफलीची सुरवात धन धन भाग.. या गोरख कल्याण रागातील विलंबित बंदिशीने केली. त्यानंतर पं. मेवुंडी यांनी बांधलेली द्रुत लयीतील आडा चौतालातील जाने नही दूंगी बालम ही बंदिश सादर केली. तसा साजनवा मोरा आए मंदिरवा ही बिहागी बंदिश गायली. त्यानंतर नमिला गणपती, छंद मजला विठ्ठलाचा हा अभंग आणि शेवटी देह जावो अथवा राहो या भैरवीने मैफलीची सांगता केली. संवादिनीसाथ डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे तर तबलासाथ केदार टिकेकर व टाळसाथ चिन्मय कुलकर्णी याने केली. निवेदन अनुश्री पानसेने केले.