मंडणगड ः स्थलांतरित गावांना मिळणार संजीवनी

मंडणगड ः स्थलांतरित गावांना मिळणार संजीवनी

Published on

समृद्ध पंचायतराज अभियान------लोगो

स्थलांतरित गावांना
मिळणार संजीवनी
मंडणगड तालुका ; ४९ ग्रामपंचायतींमध्ये अभियानाची सुरवात
सचिन माळीः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून शेतावर जाण्यासाठीचे रस्ते व दळणवळणाच्या सोयी देण्यासाठीचे नियोजन मंडणगड तालुक्यातील आजच्या ग्रामसभांमध्ये करण्यात आले. त्यामुळे शेतीला व्यावसायिक स्वरूप येईल आणि रोजगाराच्या शोधात शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, अशी आशा आहे. येथील स्थलांतर रोखले तर गावांना पुन्हा संजीवनी मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
मंडणगड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीत (ता. १७) पहिल्या टप्प्यातील उपक्रमांतर्गत पाणंद रस्तेसंदर्भात विशेष ग्रामसभा झाल्या. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावागावांतून शेतावर जाणारे रस्ते, पायवाटा, ओढ्यावरील गाडवा, मुख्य मार्ग व उपमार्गांची दुरुस्ती आणि नवे रस्ते यांची उभारणी यावर भर दिला आहे. या कामांमुळे यांत्रिकीकरण अंगिकारलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना शेतात जाणे सोपे होणार आहे. आतापर्यंत शेतकरी पावसाळ्यामध्ये चिखलातून मार्ग काढत शेतात जात होता. शेतात पिकवलेला माल ने-आण करणे शेतकऱ्याला अवघड जात आहे. रस्त्यांमुळे दळणवळण सुधारेल आणि शेतमाल थेट बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होईल. या अभियानांतर्गत गावागावात मूलभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे. रस्ते, विजेचे जाळे, पिण्याचे पाणी, जलसंधारण, ग्रामविकास प्रकल्प यांची एकत्रित अंमलबजावणी होणार असल्याने शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल आणि गावांची आर्थिक चाके पुन्हा फिरू लागतील.
मंडणगड तालुक्यातील तरुण रोजगारासाठी बाहेर जात आहेत. त्यामुळे शेतीत मनुष्यबळाची उणीव भासत आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शेतकरी हितकारक योजना प्रशासन प्रभावीपणे राबवणार आहे. पंचायतस्तरावर नियोजन करून प्रत्येक गावातील गरजेनुसार कामे हाती घेतली जातील. त्यामुळे केवळ रस्त्यांचा विकास न होता सर्वसमावेशक ग्रामविकास साध्य होईल. या ग्रामसभेला जिल्हाधिकारी मल्लिनाथ कांबळे, गटविकास अधिकारी सुनील खरात उपस्थित होते.

कोट १
ग्रामविकास, शेतकऱ्यांची प्रगती व शेवटी गावांची समृद्धी हा अभियानाचा गाभा असल्याने त्याचा फायदा गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी करून घेणे आवश्यक आहे. अभियानामुळे स्थलांतर थांबून गावातच शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- नीलेश रक्ते, अध्यक्ष तंटामुक्त समिती पाले.

कोट २
सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन अभियानाची माहिती देण्यात आली. पाणंद रस्तेअंतर्गत गावांतील रस्ते, शेतशिवारात जाणाऱ्या पायमार्ग यांची नोंद घेण्यात आली असून, विकासनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निकषाप्रमाणे कायमस्वरूपी नोंद होणार असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन अभियानांतर्गत गावचा सर्वांगीण विकास साधावा.
- सुनील खरात, गटविकास अधिकारी मंडणगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com