-मिरजोळे गाव आदर्श मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न

-मिरजोळे गाव आदर्श मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न

Published on

मिरजोळे ठरेल आदर्श ग्रामविकासाचा नमुना
पालकंमंत्री उदय सामंत ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : ज्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ होतोय. तालुक्यातील एका गावावर आपण लक्ष केंद्रित करू. प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल गाव म्हणून तयार करू. त्याच्यामागे पूर्ण ताकद उभी करू. ही नऊच्या नऊ गावं महाराष्ट्राला आदर्शवत ठरतील. या गावांना आदर्श मॉडेल बनवण्यासाठी ज्या निधीची आवश्यकता लागेल ती देण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ मिरजोळे ग्रामपंचायतीमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात झाला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील, बाळ सत्याधारी महाराज, उपसरपंच अशोक विचारे, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर कांबळे, माजी सरपंच गजानन गुरव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, आपल्या वागण्याचा सुगंध आपण चांगल्या पद्धतीने जर गावांमध्ये पसरवला तर आपण ३० दिवसांमध्ये विकासात्मक सुगंधदेखील पसरवू शकतो, हे महाराष्ट्राला दाखवू. मिरजोळे ग्रामपंचायत ही नवी रत्नागिरी आहे. तुमच्या बाजूला सहा महिन्यानंतर विमानतळ सुरू झाल्यानंतर विदेशी पर्यटक येणार आहेत. त्याच्यामुळे माझी ग्रामपंचायत जी नवी रत्नागिरी म्हणून विकसित होते ही रत्नागिरी शहरापेक्षादेखील चांगल्या पद्धतीची असली पाहिजे.

चौकट
कचऱ्याची विल्हेवाट गावातच लावा
रत्नागिरी शहरासह शहरालगतच्या पाच गावांच्या घनकचरा प्रकल्पाला पाच एकर जमीनही एमआयडीसीने या आधीच दिली आहे. त्याचा डीपीआर सुरू आहे. २५ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या गावातील कचऱ्याची विल्हेवाट गावातच लावली पाहिजे, अशी संकल्पना या अभियानामध्ये आहे.

चौकट...
महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे
आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. महिला भगिनींना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहता येईल यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. प्रत्येक महिला भगिनींना स्वत:च्या कमाईमधून १० हजार महिना कमवले पाहिजेत यासाठी आम्ही लखपती दीदी महाराष्ट्रात राबवतोय. महिला भगिनींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, क्लस्टर, खादी ग्रामोद्योगामधून मधाचा उद्योग करा. विश्वकर्मा योजनेमधील रोजगार करा. महिला भगिनींना आठ ठिकाणी सबसिडी देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचे विभाग जे आहेत ते माझ्याकडे आहेत. अभियान आपल्याला पुढे नेण्यासाठी आणि पंचायतराजचा पाया मजबूत करण्यासाठी आणि गावं स्वायत्त करावयाची असतील तर आपल्याला कटू निर्णय घ्यावे लागतील, असेही सामंत म्हणाले.

Marathi News Esakal
www.esakal.com