डॉ. महेंद्र मोहन हे साने गुरूजींच्या मानवताधर्माच्या विचारांचे वारसदार
92163
डॉ. महेंद्र मोहन हे साने गुरूजींच्या मानवताधर्माच्या विचारांचे वारसदार
डॉ. सुनीलकुमार लवटेः अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने ग्रंथतुला अन् सत्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः सध्याचा काळ हा खांदेकरी शोधण्याचा काळ आहे. नातेवाईकांपेक्षा आपल्या विचारांची माणसंच आपल्या शेवटच्या क्षणी आपल्यासोबत असतात. डॉ. महेंद्र मोहन यांनी कोणत्याही स्वार्थाच्या पुढे जाऊन एक नवा मनुष्य समाजात निर्माण केलेला आहे. जेव्हा आपण भारतीय म्हणून एकमेकांकडे बघायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने भारत महान होईल. डॉक्टरांचं आणि माझं नातं हे कर्मानं निर्माण झालेलं नातं आहे. त्यामुळेच सानेगुरूजींच्या मानवताधर्माच्या विचारांचे वारस असणारे डॉ. महेंद्र मोहन हे माझे सहोदर आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
तालुक्यातीस ओणी येथे ’वात्सल्य मंदिर’ उभारून हजारो अनाथ मुलांना हक्काचे घर मिळवून देणारे, आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करणारे डॉ. महेंद्र मोहन यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमात डॉ. लवटे म्हणाले, डॉ. महेंद्र मोहन यांनी ओणी येथे सामाजिक क्रांतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. दरवर्षी विविध कार्यक्रम आणि शिबिरे यामधून संविधानातील, सानेगुरूजींची पुरोगामी विचारधारा मुलांमध्ये रूजवण्याचे काम केले. समाजातील वंचितांचे, आदिवासींचे अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये पुरोगामी समता आणि न्यायाच्या दिशने चालणारी युवासेना उभी करण्याचे आव्हान त्यांनी पेलले असून यापुढेही त्यांचे कार्य चालू राहावे.
डॉ. सुरेश जोशी यांनी महेंद्र मोहन यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध सांगितले. मोहन यांचा शताब्दीनिमित्त सत्कार करण्यासाठीही मी येईन, असे सांगितले. डॉ. महेंद्र मोहन म्हणाले, माणसाने माणसासाठी जी काही चांगली कामे केलेली असतात आणि त्याचे जे काही चांगले गुण असतात ते म्हणजे देव या संकल्पनेनुसार मी माझे आदर्श मानत काम केले. त्यानुसार कर्मामध्ये धर्म आणि समोरच्या माणसामध्ये देव बघायला मी शिकलो. माझा धर्म मानवधर्म होता. केवळ दवाखान्यात औषध देऊन आजार बरा होणार नाही तर त्यासाठी माणसाच्या मनात असणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करायला हव्यात. यानुसार आजपर्यंत काम करत आलो. यासाठी कुटुंबीयांसह अनेकांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. महेंद्र मोहन यांची ग्रंथतुला करण्यात आली. या ग्रंथतुलामध्ये वापरलेले ग्रंथ विविध संस्थांना भेट स्वरूपात देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.