‘स्वस्थ नारी’ अभियानातून कुटुंब सशक्त

‘स्वस्थ नारी’ अभियानातून कुटुंब सशक्त

Published on

92343

‘स्वस्थ नारी’ अभियानातून कुटुंब सशक्त

नीतेश राणे ः कणकवली उपजिल्‍हा रुग्णालयात सेवेला प्रारंभ

कणकवली, ता. १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाकडे आपण आरशासारखे पाहायला हवे. यामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेत कुठे कमी पडतो, हे समोर येईल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे झालेल्या या अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनंत डिंगणे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉ. विद्याधर तायशेटे, माजी सभापती सुरेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘या शिबिरातून महिलांच्या विविध तपासण्या व उपचार होणार आहेत. महिलांचे आरोग्य सुधारल्यास संपूर्ण कुटुंब निरोगी राहते. सिंधुदुर्गात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याने त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्याचा विकास आणखी गतीमान होईल.’ डॉ. श्रीपाद पाटील म्‍हणाले, ‘या अभियानात कर्करोग, मधुमेह, मानसिक रोग आदी तपासण्या, उपचार तसेच अवयवदान व रक्तदान शिबिरे घेतली जातील. हे शिबिर २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
----------
...तर मी अचानक भेट देईन
‘आपल्याकडे पदे आहेत ती लोकसेवेसाठी आहेत, याची जाण ठेवा. या पंधरवड्यात महिलांना सेवा कशी मिळत आहे हे पाहण्यासाठी आकस्मिकपणे भेट देईन. मी कुठेही, कधीही जातो, हे तुम्हाला माहितच आहे,’ अशी मिश्कील टिप्पणीही राणे यांनी यावेळी केली.

Marathi News Esakal
www.esakal.com