विश्वासार्ह अन् मार्गदर्शक ः स्तनपानाविषयी सर्वकाही
आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक---------लोगो
(१२ सप्टेंबर टुडे ४)
स्तनपान हे निसर्गाचं अमूल्य वरदान आहे. बाळ जन्माला आल्यापासून आईच्या दुधातून मिळणाऱ्या पोषणामुळे ते शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सबळ होतं. आईचं दूध हे बाळासाठी पहिलं आणि सर्वोत्तम अन्न आहे. जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत तेच अन्न बाळाच्या वाढीसाठी पुरेसं ठरतं. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, संसर्गजन्य व पचनासंबंधी आजारांचा धोका कमी होतो आणि बाळाचं आयुष्यभराचं आरोग्य मजबूत होतं. या विषयी सांगोपांग माहिती देणाऱ्या अन् स्तनपानाविषयी भान जागृत करणाऱ्या पुस्तकाविषयी....!
- rat१८p३.jpg-
२५N९२३३१
- डॉं. शुभांगी बेडेकर, रत्नागिरी
---
विश्वासार्ह अन् मार्गदर्शक ः
स्तनपानाविषयी सर्वकाही
आजच्या बदलत्या सामाजिक आणि वैयक्तीक परिस्थितीत स्तनपानाचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं. मातृत्वाचं वय पुढे ढकललं जात आहे, अनेक स्त्रियांना गरोदरपणापूर्वीच लठ्ठपणा, थायरॉईड, मधुमेह यांसारखे आजार असतात. त्यातच ताणतणाव, असंतुलित आहार, अनियमित दिनचर्या आणि हार्मोनल समस्या वाढल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम मातांच्या आरोग्यावर होतो आणि अप्रत्यक्षपणे स्तनपानावरही पडतो. याशिवाय स्तनपानाविषयी योग्य मार्गदर्शनाचा अभाव, समाजात रूढ असलेले गैरसमज आणि माहितीचा अपुरा प्रसार हे अडथळे निर्माण करतात. अनेकांना वाटतं की, स्तनपान हे सहज जमतं; परंतु प्रत्यक्षात बाळाला ते नैसर्गिकरित्या जमतं; पण आईला त्याची कला शिकावी लागते. ही बाब बहुतेक मातांना ठाऊक नसते. अशा वेळी विश्वासार्ह आणि मार्गदर्शक अशा पुस्तकाची खरी आवश्यकता भासते.
रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभूदेसाई लिखित स्तनपानाविषयी सर्वकाही हे पुस्तक या गरजेची उत्तम पूर्तता करतं. साधी, ओघवती आणि समजण्यास सोपी भाषा, मुद्देसूद माहिती आणि शास्त्रीय आधार या पुस्तकाची खास वैशिष्ट्यं आहेत. आजच्या सोशल मीडियाच्या युगात चुकीची, अपुरी किंवा अर्धवट माहिती सहज उपलब्ध होते. अनेक मातांना त्यातून गोंधळ निर्माण होतो. अशावेळी हे पुस्तक स्तनपानाविषयी प्रमाणभूत व विश्वासार्ह साधन म्हणून काम करते.
पुस्तकात आईच्या दुधातील पोषक घटक, त्यांचे फायदे, बाळाच्या व आईच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचं उत्कृष्ट विवेचन आहे. स्तनपान करताना मातेला घ्यायचा आहार, पुरेशी विश्रांती, प्रसूतीनंतर उद्भवू शकणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय, औषधं वापरताना घ्यायची काळजी, स्तनपानाच्या योग्य स्थिती, किती कालावधीपर्यंत स्तनपान करावं या सर्व मुद्द्यांचा तपशीलवार उहापोह केलेला आहे. एवढंच नव्हे, तर मातेला होणारे मानसिक बदल, प्रसूतीनंतरचं नैराश्य, खिन्नपणा, स्तनांवरील इजा, कुटुंबनियोजन, लैंगिक प्रेरणा व कामजीवनसारख्या संवेदनशील विषयांनाही लेखकाने स्पर्श केला आहे. हे मुद्दे बहुतांशवेळा चर्चेतून वगळले जातात, त्यामुळे पुस्तकाचं महत्त्व अधिकच वाढतं.
पुस्तकाची आणखी एक आकर्षक बाब म्हणजे वडिलांसाठी खास लिहिलेला स्वतंत्र अध्याय. स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नसून त्यात पतीचा सहभाग, प्रोत्साहन आणि आधार तितकाच महत्त्वाचा आहे, हे पुस्तक ठळकपणे सांगतं. नोकरी करणाऱ्या मातांसाठी स्तनपान साठवून ठेवण्याचे मार्ग, कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यांचंही अत्यंत उपयुक्त विवेचन दिलं आहे. पुस्तकात योग्य त्या ठिकाणी समाविष्ट केलेली चित्रं व आकृत्या माहिती अधिक स्पष्ट आणि प्रभावी करतात.
माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर, ज्या मातांनी हे पुस्तक वाचलं आहे त्या प्रसूतीनंतर स्तनपानाबाबत अधिक आत्मविश्वासाने पुढे जातात. त्यांना केवळ बाळाच्या गरजांची जाण होत नाही तर स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचीही अधिक जाणीव होते. पुस्तकामुळे मातांना एक प्रकारचं भावनिक बळ मिळतं, जे या काळात अत्यंत आवश्यक असतं.
हे पुस्तक फक्त गर्भवती स्त्रियांनाच नव्हे तर त्यांचे पती, कुटुंबातील इतर सदस्य आणि प्रसूतीनंतर आईला आधार देणाऱ्या प्रत्येकाने वाचायला हवं. स्तनपानाविषयी असलेले गैरसमज दूर करून आईला सज्ज व आत्मविश्वासी होण्यास हे पुस्तक नक्कीच मदत करतं. डॉ. शरद प्रभूदेसाई यांचं स्तनपानाविषयी सर्वकाही हे पुस्तक ज्ञानदायी, प्रेरणादायी आणि उपयुक्त आहे. गर्भवती महिलांसाठी तर हे मार्गदर्शक आहेच; पण डोहाळे जेवणासारख्या प्रसंगी भेटवस्तू म्हणून द्यायलाही हे अतिशय योग्य ठरेल.
(लेखिका स्त्रीरोग प्रसूतीतज्ज्ञ आहे.)
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.