गोळवणवासीयांना ''पंचायत राज''चे धडे
swt181.jpg
N92361
गोळवणः कुमामे डिकवल गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
गोळवणवासीयांना ‘पंचायत राज’चे धडे
अभियानास प्रतिसादः ग्रामपंचायतीत विशेष सभेत उपक्रमांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : गोळवण-कुमामे-डिकवल येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता. १७) विशेष ग्रामसभा झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळवण क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले. सरपंच सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलिसपाटील, मुख्याध्यापक, ग्राममहसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच लाड यांनी अभियानाची माहिती दिली. ग्रामपंचायतीसाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या आरती कांबळी यांनी अभियानाची उद्दिष्ट्ये आणि हेतू समजावून सांगितले. ग्रामविस्तार अधिकारी प्रियंका मनवर यांनी सर्वांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. मंडळ अधिकारी अजय परब यांनी ‘फार्मर आयडी’ कार्ड, पाणंद रस्ते आणि ई-पीक पाहणी या विषयांवर मार्गदर्शन केले. ग्राममहसूल अधिकारी गौरी कोकरे यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक पाताडे यांनी सभागृह सुशोभीकरणाबाबत सूचना दिल्या. मुंबई मंडळातील श्री. नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी संजय गोसावी यांनी उपस्थितांना अभियानाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता चिरमुले, मेघा गावडे, विभा परब, मुख्याध्यापक संतोष पाताडे, कृषी सहाय्यक नीतेश पाताडे, मंडळ अधिकारी अजय परब, ग्राममहसूल अधिकारी गौरी कोकरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाश चिरमुले तसेच आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलिसपाटील आणि सुमारे २१२ ग्रामस्थ उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या महत्त्वपूर्ण अभियानाचा प्रारंभ झाला.