महाविस्तार अॅपवर हवामानातील बदलांची माहिती

महाविस्तार अॅपवर हवामानातील बदलांची माहिती

Published on

महाविस्तार अॅपवर हवामानाची माहिती
शिवकुमार सदाफुले ः शेतीतील डिजिटल क्रांतीला पोषक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः शेतकऱ्यांना हवामानातील बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप कृषी विभागाने विकसित केले आहे. हे अॅप शेतीतील डिजिटल क्रांतीला पोषक आहे. त्याचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
महाविस्तार एआय हे एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेतीपद्धतींचे मार्गदर्शन करते. महाविस्तार एआय अॅपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो. रिअल टाइम हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खताचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते, कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी, विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतात. अॅपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पिकाची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अॅपमधील एआय तंत्रज्ञानामध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडीचे निदान करून उपाय मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले.

चौकट
शेतीविषयक सल्ला मोबाइलवर
महाविस्तार एआय अॅप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. त्यामुळे शेतीविषयक सल्ला मोबाइलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो आणि चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्यवेळी पिकाची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास सदाफुले यांनी व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com