
-rat१९p१५.jpg-
२५N९२६३१
राजापूर ः मोकाट गुरांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत बोलताना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन. शेजारी तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी जाधव, पोलिस निरिक्षक अमित यादव,
----
मोकाट गुरांचे शंभर टक्के ‘टॅगिंग’करा
प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन ः मालकांवर कारवाईचे आदेश, ग्रामस्तरीय समित्या गठीत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ : मोकाट गुरे ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर सहाय्यभूत ठरणारी ग्रामस्तरीय समिती गठित करणे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करण्याची सूचना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी आज झालेल्या सभेमध्ये प्रशासनाला दिल्या. मोकाट गुरांच्या मालकांवर आवश्यकतेप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी सूचित करताना मोकाट गुरांची समस्या सोडवण्याची केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून सर्वांचीच आहे. त्यामुळे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सातत्याने वाहनांची रहदारी असलेल्या मार्गासह राजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी मोकाट गुरे रस्त्यामध्ये ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतूककोंडीसह अनेकवेळा अपघाताला आमंत्रण ठरते. त्यामुळे मोकाट गुरांच्या समस्येवर योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, मोकाट गुरांच्या समस्येची तत्काळ दखल आमदार किरण सामंत यांनी घेताना प्रशासनाला तातडीची बैठक आयोजित करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.
या बैठकीला तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी जाधव, पोलिस निरीक्षक अमित यादव, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव चोपडे, नगर पालिकेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. अरविंद लांजेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, भाजपचे रवींद्र नागरेकर, फारुख साखरकर, मनोहर गुरव, दिवाकर आडविरकर, आजीम जैतापकर, मंदार ढेवळे यांनी चर्चेत भाग घेऊन मोकाट गुरांच्या समस्येवर योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलिस निरीक्षक यादव यांनी मोकाट गुरांच्या मालकांवर कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करता येईल, याची माहिती दिली. डॉ. चोपडे यांनी इअरटॅगिंगद्वारे गुरांच्या मालकांचा शोध कसा घेता येईल, याची माहिती दिली. पालिकेद्वारे मोकाट गुरांवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोतदार यांनी दिली. गुरांचा मालक समजण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शंभर टक्के इअरटॅगिंग करण्याचेही ठरवण्यात आले.
---
चौकट
विशेष ग्रामसभेद्वारे समिती गठित करा
मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेणे, कायदेशीर कारवाईला सहकार्य करणे यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून ग्रामस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट
ग्रामीण भागात कोंडवाड्याची अडचण
शहरातील मोकाट गुरे पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी नगर पालिकेकडे स्वतःचा कोंडवाडा आहे; मात्र, गावातील (ग्रामपंचायत हद्द) गुरे पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींकडे कोंडवाडा उपलब्ध नाही. त्यावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्तरीय समितीने भाडेतत्त्वावर वा अन्य मार्गाने कोंडवाड्याची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले.