जनतेला वेठीस धरू नका; कारभार पारदर्शक ठेवा

जनतेला वेठीस धरू नका; कारभार पारदर्शक ठेवा

Published on

92652

जनतेला वेठीस धरू नका; कारभार पारदर्शक ठेवा

पालकमंत्री नीतेश राणे ः दोडामार्गात ‘बांधकाम’च्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ ः सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय सुसज्ज व सुटसुटीत झाले आहे, त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आपला कारभार सुटसुटीत व पारदर्शक करायला हवा. सर्वसामान्य माणसाला सन्मानपूर्वक वागणूक द्या, मी जनतेला महत्व देतो. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निवारण तात्काळ करा. जनतेला तुम्ही वेठिस धरण्याचा प्रयत्न केल्यास गाठ माझ्याशी आहे. पालकमंत्री म्हणून माझी सर्वांवर बारीक नजर आहे. जनतेच्या तक्रारीवरून तुमच्या कार्यालयात माझी धाड पडणार नाही याची काळजी घ्या, असा सज्जड इशारा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिला.
येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन इमारतीचा उद्‍घाटन सोहळा पालकमंत्री राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, लखमराजे भोसले, महिला जिल्हाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक गवस, शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, एकनाथ नाडकर्णी, परिविक्षाधीन प्रांताधिकारी लक्ष्मण कसेकर, प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘बांधकाम उपविभागाची सुसज्ज अशी इमारत ठरलेल्या वेळेत पूर्णत्वास आली. त्यामुळे सर्वप्रथम या विभागाचे अभिनंदन करतो. महायुती सरकारमधील सर्व मंत्री रयतेचे राज्य म्हणून सरकार चालवत आहेत. या सरकारच्या सुरुवातीच्या पहिल्या दहा महिन्यात खूप कामे झाली आहेत. या जिल्ह्यातील माझ्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.’’ सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार विश्राम गृहामधून चालवला जायचा. या कार्यालयाची स्वतंत्र व सुसज्ज अशी नूतन इमारत झाल्याने आता येथून कारभार चालवला जाणार आहे. विश्राम गृहासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्यामार्फत हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात या विभागाच्या अनेक नूतन कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. पूर्वी या विभागाशी निगडीत अनेक कामांसाठी रत्नागिरी येथे हेलपाटे मारावे लागायचे. यात वेळेचा अधिक अपव्यय होऊ लागला व कामे वेळेवर पूर्ण होत नसत. हेच चव्हाण यांनी अचूक हेरले व त्यादृष्टीने या विभागाचे कार्यालय या जिल्ह्यात आणले. त्यांच्या कारकिर्दीतच या जिल्ह्यातील चांगल्या रस्त्यांचे जाळे अधिक प्रमाणात विणले गेले, असे पालकमंत्री राणे यांनी आवर्जून सांगितले.
---------------
आता पुन्हा फोनाफोनी नाही, सरळ ॲक्शन!
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पोलिसांना हे अवैध धंदे बंद करायला जमत नसतील तर मी आहेच. मला या तालुक्यातीलही सर्व अवैध धंद्यांची माहिती आहे. येथील पोलिस निरीक्षकांना पूर्वीच कारवाई करण्यासाठी सक्त सूचना केल्या आहेत. माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ हे अवैध धंदे बंद करा. मी आता पुन्हा फोनाफोनी करत बसणार नाही तर सरळ ॲक्शन घेणार, अशा कडक शब्दांत मंत्री राणे यांनी पोलिस प्रशासनास सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com