रत्नागिरी -जखमी बिबट्या उपचारासाठी पुण्यात रवाना

रत्नागिरी -जखमी बिबट्या उपचारासाठी पुण्यात रवाना

Published on

साडवलीतील जखमी
बिबट्यावर पुण्यात उपचार
वनविभागाची तत्परता ः प्रकृतीत सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः संगमेश्वर तालुक्यातील साडवली-कासारवाडी गावातील राजेंद्र धने यांच्या घरामागे जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्याला वनविभागाने पकडून त्याच्यावर दोन दिवस उपचार केले; मात्र पुरेशी यंत्रणा नसल्याने अधिक उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, त्या बिबट्याला गुरूवारी (ता. १८) पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
बुधवारी (ता. १७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या धने यांच्या घरामागे येऊन बसला होता. पायाला जखम झाल्यामुळे त्याला वेगवान हालचाल करणे शक्य होत नव्हते. घराच्या परिसरात मुक्तपणे तो फिरत होता. परिसरात माणसांचा कोलाहल असला तरीही तो आक्रमक झालेला नव्हता. बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय साधारण ३ ते ४ वर्षे आहे. त्याच्या डाव्या मागील पायाच्या मांडीला जखम झाली होती. तो उपाशी असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्या बिबट्याला पकडून संगमेश्वर येथे आणले गेले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. बिबट्याला ठेवलेला पिंजराही आकाराने लहानच असल्याने उपचार करताना अडचणी आल्या. त्यावरही मात करत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शन देणे किंवा सलाईन लावणे, असे उपचार केले; परंतु त्यातील मर्यादा लक्षात घेऊन अखेर अधिक उपचारासाठी बिबट्याला पुण्यातील रेस्क्यू केंद्रात पाठवण्याचा निर्णय वनविभागाकडून घेण्यात आला. त्यानुसार काल बिबट्याची रवानगी तिकडे करण्यात आली. त्याची तब्येत सुधारत असल्याचे वनविभागाचे प्रादेशिक वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले.
-----
चौकट
टीटी सेंटरचा प्रस्ताव प्रलंबित

जिल्ह्यात बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाद्य पकडण्यासाठी लोकवस्तीजवळ येण्याचे प्रकार वाढत आहेत. बिबट्या विहिरीत पडणे, घरामध्ये शिरणे, विविध कारणांमुळे जखमी होणे अशा घटना लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) सुरू करावी, असा प्रस्ताव वनविभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यात ब्लॅकपॅंथरचा बछडा आढळला होता. त्याला उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आला. अशा प्राण्यांवर उपचार करणारे केंद्र तयार करावे, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com