मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 30.55 लाखाची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 30.55 लाखाची मदत

Published on

‘मुख्यमंत्री सहाय्यता’तून ३० लाखांची मदत
जिल्ह्यातील ४० रुग्णांना लाभ ; रुग्णांसाठी संजीवनी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आजअखेर जिल्ह्यातील ४० रुग्णांना ३० लाख ५५ हजार रुपयांची मदत झाली. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.
राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात २२ फेब्रुवारीला शासननिर्णय झाला. वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी यासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रुग्ण व नातेवाइकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाइकांची परवड थांबवण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसाहाय्य वितरित करणे, या दोन्ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहेत. नागरिकांची सोय लक्षात घेऊन अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामुळे अर्जदारांना मंत्रालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. जिल्हास्तरीय समिती ही स्थानिक पातळीवरच्या गरजा आणि अर्जदारांना तत्काळ मदत देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

चौकट
...या आजारांवर मिळते मदत
अंतस्थ कर्णरोपण शस्त्रक्रिया वय वर्षे २ ते ६, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात/विद्युतजळीत रुग्ण आदींचा यामध्ये समावेश आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com