सावंतवाडी रुग्णालयासाठी जनरेटा हवा
92809
सावंतवाडी रुग्णालयासाठी जनरेटा हवा
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे : रिक्त पदे भरण्याची आवश्यकता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० : रुग्णांच्या फायद्यासाठी सावंतवाडीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय होणे काळाची गरज आहे; मात्र त्या गडबडीत तूर्तास सर्वसामान्य रुग्णांसाठी चांगली सेवा देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व कमी होणार नाही, यासाठी सावंतवाडीकरांनी पुढाकार घ्यावा. रिक्त असलेली पदे भरण्यासाठी सर्व राजकीय मंडळी जनरेटा लावून धरावा, अशी आग्रही मागणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केली.
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले उपक्रम रुग्ण आणि विशेषता महिलांच्या फायद्यासाठी आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने काल (ता. १९) येथील उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, माजी नगरसेवक गुरू मठकर, दीपाली सावंत, दीपाली भालेकर, उमाकांत वारंग, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, संजय माजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर, अनारोजीन लोबो आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. ऐवळे म्हणाले, ‘‘सावंतवाडी रुग्णालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिली जात आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता काम कसे चालते, याचा अंदाज येतो. त्यामुळे मल्टिस्पेशालिटीची मागणी करणाऱ्या सर्वपक्षीयांनी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा भविष्यात कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करावे. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणे काळाची गरज आहे. मात्र, मल्टीस्पेशालिटीमध्ये कर्करोगासारख्या आजारांवर उपचार होणार आहेत, तर प्रसूती किंवा अन्य छोट्या-मोठ्या आजारांवर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार होणार आहेत. त्यामुळे येथील डॉक्टर आणि रुग्णालयाचा दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न करावा. मी व डॉ. पांडुरंग वजराटकर येणाऱ्या काळात निवृत्त होत आहोत, तर दोन डॉक्टरांनी त्यांचा कालावधी संपल्यामुळे बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी चांगले डॉक्टर असणे गरजेचे आहे.’’
मनीष दळवी यांनी, सावंतवाडी रुग्णालयात चांगले काम सुरू आहे. त्याचे श्रेय २४ तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जाते. येथील रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. संजू परब यांनी, सावंतवाडी रुग्णालयाने नेहमी सकारात्मक काम केले आहे. या रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी आमचे कायम प्रयत्न आहेत, असे सांगितले. लखमराजे भोसले यांनी, सावंतवाडी रुग्णालयात चांगली सेवा दिली जात असून त्याचा फायदा येथील गोरगरीब रुग्णांना होत आहे, असे कौतुकोद्गार काढले. यावेळी रक्तदान संघटनेच्या माध्यमातून काम केल्याबद्दल देव्या सूर्याजी यांचा सत्कार करण्यात आला.
.......................
सेवा पंधरवड्यातील उपक्रमांचा लाभ घ्या
ज्याप्रमाणे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी या रुग्णालयाचा आलेख कायम उंचावर ठेवला, त्याचप्रमाणे यापुढेही हा आलेख तसाच राहावा, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही लोकांकडून रुग्णालयाची बदनामी सुरू आहे, ती थांबणे गरजेचे आहे, असे सांगत सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. ऐवाळे यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.