-मराठी प्रत्येकाच्या व्यवहारात, संस्कारात वसली पाहिजे
मराठी भाषा व्यवहारात, संस्कारात वसली पाहिजे
संपदा जोगळेकर-कुलकर्णी ः लेखसंग्रहाचे चिपळूणमध्ये प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान नुकताच प्राप्त झाला आहे. हा मान अभिमानास्पद असला तरीही केवळ पुरस्कार, मानपत्रे आणि समारंभापुरता मर्यादित न राहता मराठी प्रत्येकाच्या श्वासात, व्यवहारात आणि संस्कारात वसली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी केले.
प्रा. संगीता जोशी यांच्या ‘सन्माननीय व्यासपीठ’ या लेखसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमाला राजीव बर्वे, अंजली बर्वे, लेखिका प्रा. संगीता जोशी उपस्थित होत्या. या वेळी संपदा जोगळेकर म्हणाल्या, मराठी ही फक्त संवादाचे साधन नाही. ती संस्कृती, परंपरा आणि आपली ओळख जपणारी आहे. आजच्या तरुणाईने मराठीला शालेय शिक्षणापुरतीच मर्यादित न ठेवता तंत्रज्ञान, नाट्य, साहित्य, चित्रपट आणि सर्वच क्षेत्रांत ती वापरली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या मनोरंजन प्रवाहातील काही गोष्टींवर खंत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, मराठी नाटकांना आज प्रामुख्याने पन्नाशीच्या पुढील श्रोतावर्गाची साथ मिळते; पण चाळिशीच्या आतील तरुणवर्ग वेगळ्याच मनोरंजनाच्या आहारी गेला आहे. त्यांना मराठी नाटक पाहण्यात रस नाही, ही बाब खरोखरच वेदनादायी आहे. समाजात वाचनसंस्कृती घटत चालली आहे, यावरही त्यांनी चिंतन मांडले. पुस्तके विकली जातात, वाचलीही जातात; पण वाचनाचा संसर्ग वाचकांना होत नाही. ग्रंथालये हा आपला अमूल्य ठेवा आहे; पण प्रत्येक घरात स्वतःचे छोटेसे ग्रंथालय असणे गरजेचे आहे. ते फक्त पुस्तकांचा संग्रह नसून, ती आपली अभिरुची आणि संस्कृतीची संपन्नता दर्शवणारी परंपरा आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
या कार्यक्रमात डॉ. प्रशांत पटवर्धन म्हणाले, सध्या मराठी नाटकांना फार कमी प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित असतो. तो वाढायला हवा. संगीता जोशी यांनी भाषण कलेसोबतच मराठी नाटकांमधूनदेखील काम केले आहे तर राजीव बर्वे यांनी भाषणात पाठांतर नको, आकलन असले पाहिजे अशी सूचना केली. या प्रसंगी अरुण इंगवले, डॉ. मीनल ओक, मनीषा दामले आदींनी देखील मनोगते व्यक्त केली.
------
चौकट
मराठीचा सन्मान करा
मराठीला पैठणीसारखी कपाटात बंद करू नका. ती दैनंदिन जीवनात खुली राहू द्या. लिखाण, वाचन, संभाषण प्रत्येक क्षेत्रात मराठीला स्थान मिळाले तरच तिचा खरा सन्मान होईल, अशी साद संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी तरुणाईला घातली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.