दोडामार्ग अमली पदार्थांच्या विळख्यात
92863
कणकवली ः पालकमंत्री नीतेश राणे यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी. (छायाचित्र ः संदेश देसाई)
दोडामार्ग अमली पदार्थांच्या विळख्यात
शिंदे शिवसेनेची खंत; पालकमंत्री नीतेश राणे यांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २० : तालुक्यात अवैध धंदे दिवसागणिक वाढू लागले आहेत. दारू, मटका, जुगार याबरोबर आता अमली पदार्थांच्या विळख्याने तालुक्यातील युवकांना ग्रासले आहे. आजची तरुणाई अमली पदार्थ सेवन करण्याच्या आहारी जात असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी, असे निवेदन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेली कित्येक वर्षे दोडामार्ग तालुक्यात दारू, मटका, जुगार यांसारखे अवैध धंदे बेदरकारपणे चालू आहेत. या धंद्यांबाबत कोणी तक्रर केल्यास पोलिस तात्पुरती कारवाई करत असत; मात्र काही काळानंतर हे अवैध धंदे परत चालू होत असत. बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांचे हात वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचले होते; परंतु, आपण काही दिवसांपूर्वी कणकवलीमध्ये केलेल्या धडक कारवाईमुळे अशा प्रकारचे धंदे कायमस्वरुपी बंद होत असल्याचे सुखदायक चित्र दिसत आहे. त्याबद्दल शिवसेनेतर्फे आम्ही अभिनंदन करतो; मात्र दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षांत गांजा आणि इतर ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. परप्रांतातून गांजा मोठ्या प्रमाणात तालुक्यात येत आहे. कॉलेजमधील तरुण ड्रग्सच्या व्यसनाधीन होत आहेत. सुरुवातीला गोव्याच्या सीमावर्ती गावांमध्ये गांजा विक्री होत होती, पण आता पूर्ण तालुका गांजा आणि इतर ड्रग्सच्या विळख्यात अडकला आहे. ड्रग्स व्यावसायिक दोडामार्ग तालुक्याचा उपयोग ‘डम्पिंग स्टेशन’ म्हणून वापर करत आहेत. तालुक्यामधून गोव्यात ड्रग्स पाठवला जात आहे. ही परिस्थिती आताच नियंत्रणात न आणल्यास भविष्यात येणाऱ्या पिढीची अवस्था भयावह असेल. त्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यामध्ये अमली पदार्थंविरोधी खात्याच्या पथकाचे केंद्र स्थापन करावे. तेव्हाच ड्रग्स धंद्यात सहभागी असलेल्यांपर्यंत पोहोचता येईल. यावर कडक कारवाई करण्यासाठी आपण लक्ष घालावे, अशी मागणी करून निश्चितच त्यादृष्टीने सकारात्मक विचार करून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा प्रमुख शैलेश दळवी, उपतालुका प्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, युवा तालुकाप्रमुख भगवान गवस, विठोबा पालेकर, सूर्यकांत गवस, विशांत तळवडेकर आदी उपस्थित होते.
.......................
बांदा-आयी मार्गाचे दुपदरीकरण व्हावे
तीन राज्यांना जोडणारा दोडामार्ग तालुका विकासाच्या प्रगतीपथावर आहे. पूर्वी या तालुक्यातून क्रमांक १७ हा राष्ट्रीय महामार्ग जात होता. मात्र, हा राष्ट्रीय महामार्ग बदलून बांदा-पत्रादेवी येथून पणजी असा वळविला. महामार्ग वेगळ्या दिशेने वळविल्याने तालुक्यातील रस्त्यांचा दर्जा काहीसा कमी झाला. सध्या बांदा-आयी जोडणारा १८६ क्रमांकाचा राज्यमार्ग पूर्वीच्या स्थितीत आहे तसा आहे. या राज्यमार्गाचे दुपदरीकरण व्हावे, जेणेकरून आडाळी एमआडीसी तसेच गोवा, कर्नाटकसाठी दळणवळणाचे साधन मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
---
तहसीलदारासह रिक्त पदे भरा
दोडामार्ग तालुक्याचे तहसीलदार पद गेले काही महिने रिक्त आहे. तालुक्याला तहसीलदार मिळावे, यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली; मात्र अद्यापही त्या मागणीची पूर्तता झालेली नाही. हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने लोकांना अनेक अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे तहसीलदार पद व अन्य महसुली रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.