सदर
rat21p5.jpg
N92932
डॉ. प्रशांत परांजपे
इंट्रो
माझी वसुंधरा ही सुजलाम, सुफलाम, हरितमय आणि जलयुक्त राहण्यासाठी मी आजपासून कटिबद्ध आहे, असा संकल्प सर्वांनी यंदाच्या नवरात्रोत्सवापासून केला पाहिजे. मी उपवास करणार आहे, तो माझ्या वसुंधरेसाठी आहे. कारण माझी वसुंधरा आता कोपली आहे. तिला जाणून घेण्याचा, शांत करण्याचा हा प्रयत्न आहे...!
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
माझ्या वसुंधरेसाठी धरूया उपवास!
‘माझी वसुंधरा’ ही वसुंधरा खरंच माझी आहे का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारल्यावर लक्षात येतं की, जर खरंच मी तिला माझी मानली असती, तर तिच्यावर इतके अत्याचार कधीच केले नसते. ‘माता, भूमी, जननी’ अशा अनेक बिरुदावल्यांनी आपण पृथ्वीला गौरवतो, पण त्याच वेळी तिचा अधिभार वाढवत राहतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण करतो.
सध्या ‘स्वच्छता पंधरवडा’ सुरू आहे. या निमित्ताने अनेक समुद्रकिनारे शासन स्तरावर स्वच्छ केले जात आहेत. पण यानंतर त्या कचऱ्याचं काय, हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. मात्र मला वेगळाच प्रश्न पडतो. किनाऱ्यांची स्वच्छता अनेकदा केली जाते, तरीही ते स्वच्छ दिसत नाहीत. का ? कारण ‘स्वच्छता ही सेवा’ म्हणून आपण ती आत्मसातच केलेली नाही. शासनाच्या नियमांचे पालन करत एक फाईल बंद केली की आपलं कर्तव्य पूर्ण झालं, असं आपण समजतो. हे एक कटू सत्य आहे.
समुद्राच्या तळाशी असलेले अनेक जीव आता किनारपट्टीवर मृत अवस्थेत सापडत आहेत. ही मोठ्या धोक्याची घंटा आहे. वारंवार स्वच्छता मोहीम राबवावी लागू नये, यासाठी प्रत्येकाच्या हाताला ‘चांगल्या सवयींचा’ लळा लागणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाने गेल्या सहा वर्षांपासून माझी वसुंधरा हे अतिशय महत्त्वाकांक्षी, अभ्यासपूर्ण अभियान सुरू केले. पण दुर्दैवाने हे अभियान जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात काही प्रमाणात अपयश आले. कदाचित, ‘मला काय फरक पडतो?’ या मानसिकतेमुळे जनतेनेच याकडे पाठ फिरवली असावी.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता, या अभियानात फारच कमी ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. हजारो ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यात केवळ १२-१३ ग्रामपंचायतींचा सहभाग हा धक्कादायक आहे. अशा परिस्थितीत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांसारख्या संस्थांनी जनजागृती करण्यात कमीतरता दाखवली का, हा प्रश्न उभा राहतो. पण आपण यावर फक्त चर्चा करत बसण्याऐवजी, प्रत्यक्ष कृतीचा संकल्प करायला हवा. प्रत्येकाने आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाऊन हे अभियान समजून घेतलं पाहिजे.
“माझी वसुंधरा” हे केवळ पर्यावरणासंबंधी एक अभियान नाही, तर भविष्यासाठीचा शाश्वत विकासाचा महामार्ग आहे.
पंचमहाभूतांमध्ये संतुलन साधण्यासाठी जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, भूजलपातळी, हरित आच्छादन, अक्षय ऊर्जा वापर आदी बाबींवर समर्पक आणि परिणामकारक काम सुरु आहे. या अभियानाचा भाग होणं केवळ गुणांकनासाठी, बक्षिसासाठी, किंवा अहवालासाठी नव्हे, तर आपल्या भावी पिढीसाठी आहे. सुजलाम-सुफलाम, हरितमय आणि जलयुक्त वसुंधरेसाठी प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष सहभाग आज अत्यावश्यक आहे.
यंदा नवरात्रोत्सवापासून आपण संकल्प करूया. ‘माझी वसुंधरा’ ही सुजलाम, सुफलाम, हरितमय आणि जलयुक्त राहावी यासाठी मी आजपासून कटिबद्ध आहे. मी उपवास करणार आहे. पण तो उपवास माझ्या वसुंधरेसाठी असेल! उपवास म्हणजे उपवास चांगल्या गोष्टींचा सहवास. देवाजवळ जाण्याचा, पावित्र्य टिकवण्याचा प्रयत्न. पण देव म्हणजे केवळ देवळातील मूर्ती नव्हे, तर पंचमहाभूतांमध्येच परमेश्वराचे अस्तित्व आहे, हे विसरून चालणार नाही. आपली प्रथम देवता म्हणजे धरित्री. तिचा आपण सतत अपमान करत आलो. वृक्षतोड, जलप्रदूषण, मृदाप्रदूषण, वायूप्रदूषण करत करत आज ती कोपली आहे. याचेच परिणाम आपल्याला सध्याच्या हवामानात, बदलत्या ऋतूप्रमाणात, रोगराईत दिसून येतात. उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नव्हे, तर चांगल्या गोष्टींचा सहवास आणि वाईट गोष्टींपासून दूर जाण्याचा संकल्प. यापुढे आपण उपवास करू, पण तो आपल्या वसुंधरेसाठी, पर्यावरणासाठी, आणि आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी !
(लेखक पर्यावरणाच्या शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.