दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टोबरला उपोषण
दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टोबरला उपोषण
जल फाउंडेशनचे आंदोलन ; रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासातील महत्त्वाची दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्यासह मुंबई-चिपळूण या नव्या रेल्वे गाडीसाठी जल फाउंडेशनने दंड थोपटले आहेत. दोन्ही मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी दादर येथे एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. त्याआधीच रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर १९९६ पासून धावत असून, कोकणवासीयांची ‘लाईफलाईन’ ठरलेली होती. विक्रमी गर्दी खेचणारी ही सेवा कोरोनाकाळात बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू झालेली नाही. त्यामुळे मुंबईत नोकरी, शिक्षण वा इतर कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही पॅसेंजर केवळ प्रवाशांसाठी सोयीची नव्हे, तर रेल्वेला उत्पन्न देणारी होती. त्यामुळे आता रेल्वे बोर्डाने कोकणवासीयांचा अंत पाहू नये, असा इशारा जल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिला आहे.
मुंबई-चिपळूणदरम्यान नियमितपणे धावणारी नवीन गाडी सुरू करण्याची मागणीही संस्थेने केली आहे. या गाडीमध्ये द्वितीय श्रेणी आरक्षित, वातानुकूलित चेअरकार आणि सामान्य अनारक्षित डबे असावेत. तसेच दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, आंजणी आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे द्यावेत. गाडीचे वेळापत्रकही प्रवाशांच्या सोयीप्रमाणे पहाटे मुंबईहून सुटणारे आणि दुपारी वा सायंकाळी परतणारे असावे, असा आग्रह धरला गेला आहे.
चौकट
कोकणवासीयांची नजर रेल्वे बोर्डावर
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला पाठपुरावा अद्याप फलद्रुप झालेला नाही. त्यामुळे २ ऑक्टोबरच्या उपोषणानंतर रेल्वे बोर्ड कोणती भूमिका घेतो, याकडे कोकणवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ‘आमच्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोकणवासीयांना न्याय मिळणार नाही,’ असे मत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.