जिल्ह्यात एसटी घाट्यात

जिल्ह्यात एसटी घाट्यात

Published on

rat२१p९.jpg-
N९२९७२
ग्रामीण भागातील प्रवाशांचा एसटीवरच भरवसा आहे. त्यामुळे बसस्थानकात अशी गर्दी पाहायला मिळते.
rat२१p१०.jpg
९२९७०
चिपळूण ते अयोध्या दर्शन बसला चांगला प्रतिसाद मिळाला.

इंट्रो

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी ही जिल्ह्यातील सर्वसामान्यांची आजही जीवनवाहिनी आहे. बदलती जीवनशैली आणि आधुनिकतेमुळे एसटीच्या ताफ्यातही काळानुरूप नवीन गाड्या आल्या. लाल डबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीने खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी नवे बदल केले आहेत. शासनाकडून महिला आणि ज्येष्ठांसाठी जाहीर केलेल्या सवलतीमुळे तर एसटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. परंतु या सर्व बदलांमध्ये एका गोष्टीत मात्र बदल झालेला नाही, तो म्हणजे एसटी महामंडळाचा तोटा. चांगले दिवस असोत, सण-वार असोत, महामारी असो एसटी महामंडळाला तोटा भरून काढण्यात काहीच यश आलेले नाही. अनेकदा कोलमडलेले एसटीचे वेळापत्रक, अवैध प्रवासी वाहतुकीवर न मिळवलेले नियंत्रण, सर्वेक्षण न झाल्याने वाढलेले थांबे पण गाड्यांची धाववेळ तीच राहिली, एसटी बसस्थानकांची रखडलेली कामे, गाड्यांच्या दुरुस्ती-देखभालीतील अडथळे अशा काही समस्यांमुळे एसटी अडचणीत आहे. वाहतूक व्यवस्थेच्या अनेक सुविधा व नवीन गाड्या पुरवूनही एसटी महामंडळाचे चाक आजही आर्थिक तोट्यातच अडकलेले आहे. रत्नागिरी विभागात जवळपास ९०० चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. ऑगस्टमध्ये रत्नागिरी विभागाला २.८८ कोटी रुपयांचा तोटा झाला असून संचित तोटा ३.३७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

(संकलन - राजेश शेळके, मुझफ्फर खान, राजेंद्र बाईत, मकरंद पटवर्धन.)

जिल्ह्यात एसटी घाट्यात
खासगी वाहतुकीशी स्पर्धा; कात टाकण्याचे प्रयत्न अपुरे

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांचे एस. टी. हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली असली, तरी ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी हीच वाहतुकीचे प्रामुख साधन आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रत्येक गावात एस्. टी. वाहतुकीची सेवा आहे. रत्नागिरी विभागात ९ तालुके असून, ८ आगार, १७ बसस्थानके, १२ वाहतूक नियंत्रक केंद्रे आणि १२९ मार्ग निवारे आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार ३९७ गावे असून, जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे १६ लाख १७ हजार आहे. त्यापैकी रा. प. प्रवासी वाहतूक थेट सेवेचा लाभ १ हजार ३७८ गावांना मिळते.


चौकट
एक नजर
*अशी सुरू आहे वाटचाल ः रत्नागिरी विभागाला ६४ वर्षे पूर्ण झाली असून या विभागात सुमारे ७२० बसेस धावतात. त्यात लालपरी, शिवशाही, स्लिपर, शहरी बसचा समावेश आहे.
* एसटीचे सवलतीपोटीचे येणे ः शासनाने एसटी बसमध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत आहे. महिला प्रवाशांना बसतिकिटात ५० टक्के सूट मिळते. यामुळे एसटीचे भारमान वाढले. परंतु त्यातून एसटीचा तोटा भरुन निघालेला नाही. या सवलतीचे शासनाकडून १८ कोटी रूपये प्रलंबित आहेत.
* महिन्याला एसटीला पाच कोटीचा तोटा ः एसटी सेवा देताना महामंडळाला दर महिन्याला सुमारे साडेचार ते पाच कोटीचा तोटा सहन कराव लागत आहे. त्यात शहरी वाहतुक न परवडणारी असल्याने त्यामध्ये महामंडळाला अधिक तोटा होतो. जुन, जुलै महिन्यात तर हा तोटा साडेपाच ते सहा कोटीच्या वर जातो. त्यानंतर गणेशोत्सव व इतर सणांमुळे एसटीचा तोटा दीड ते दोन कोटीने कमी होतो. गेल्या २५ वर्षांमध्ये मे महिन्यात प्रथमच एसटी फायद्यात होती. त्यानंतर पुन्हा उलटे फेरे चालु झाले. आता दर महिन्याला पाच कोटींच्या दरम्यान तोटा सहन करावा लागत आहे.

-----

फेरमार्ग सर्व्हेक्षण आवश्यक

एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बीएस ६ मानांकनाच्या गाड्यांना असलेल्या अद्यावत ओडोमीटर आहे. यामुळे किलोमीटरची निश्चित आकडेवारी समोर आली असून जुनाट पद्धतीने मोजलेल्या विविध एसटी मार्गावरील अतिरिक्त किलोमीटरची पोलखोल झाली आहे. चालकांचे काम वाढले असून त्यांची आर्थिक व शारीरिक पिळकवणूक होत आहे. जास्त किलो मीटर आणि अधिक थांबे असल्यामुळे दिलेल्या वेळेत गाडी जाऊन परत आणताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हात दाखवेल तिथे गाडी थांबवता येत नाही, प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होण्याची शक्यता असते, वेळापत्रक कोलमडून प्रवासी वर्ग तुटत आहे. चालकांची ही फरफट थांबविण्यासाठी फेर मार्ग सर्व्हेक्षण करण्याची मागणीसाठी चालकांनी जोर धरला आहे.

एसटी कात टाकतेय

* सीएनजीच्या बसेस दाखल ः डिझेलवरील महिन्याला लाखो रुपये खर्च करणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ६० सीएनजी गाड्या दाखल होणार आहेत. या गाड्या प्रदूषणविरहित आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, दापोली आणि खेड आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम महावितरण कंपनी करत आहे.
* ई-बसेस सेवेत रुजू ः एसटी महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची परिस्थिती गंभीर असल्याने नवीन गाड्या घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरीत ३० नवीन बसेस घेण्यात आल्या आहेत. लवकरच प्रदूषणविरहित ३० ई-बसेसही येणार आहेत.
* भाड्याच्या ४० खासगी बसेस ः एसटी महामंडळाची काही धोरणे आर्थिक खाईत लोटणारी ठरत आहेत. रत्नागिरी एसटी विभागाकडे जिल्ह्यात ८५० गाड्या होत्या. त्यापैकी काही वयोमान संपल्याने भंगारात काढल्या. त्या बदल्यात मोजक्याच नवीन गाड्या मिळाल्या. काही गाड्यांची दुरुस्ती सुरू आहे, तर काही वापरात नाहीत. त्यामुळे फक्त ६७० गाड्याच प्रवासी सेवेत आहेत. ही कमी भरून काढण्यासाठी महामंडळाने नवीन बस खरेदी न करता ४० खासगी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बसेसना प्रती किलोमीटर ४७ रुपये प्रमाणे भाडे दिले जाते.
* तूट टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट सुविधा ः एसटी गाड्यांमध्ये अँड्रॉइड तिकीट मशीनद्वारे डिजिटल पेमेंट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. यूपीआय, क्यूआर कोड आदींच्या माध्यमातून प्रवाशांना रोख पैसे न देता डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढता येते. जिल्ह्यातील सर्व म्हणजे ६०० गाड्यांमध्ये ही मशीन बसवण्यात आली आहेत. त्यामुळे तूट भरून काढणे शक्य झाले आहे. तसेच चिल्लर नसल्यामुळे होणारे वादही कमी झाले आहेत.

----

सहलींमुळे मिळाले एसटीला बळ

रत्नागिरी एसटी विभागाला शैक्षणिक सहलींमुळे आर्थिक हात मिळाला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महामंडळाने सहलींसाठी ७५० गाड्या पुरविल्या होत्या. त्यामुळे एसटी विभागाला ३ कोटी ९ लाख ४० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. सवलतीच्यादरात देण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे महामंडळाच्या तिजोरीत भर पडत आहे.

-----

उत्पन्न देणारी कारगो सेवा बंद

कोरोना काळातील दीड वर्षे आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाच्या पाच महिन्यांमुळे एसटी मोठ्या आर्थिक संकटात सापडली. सार्वजनिक एसटी वाहतूक शंभर टक्के सुरू झाली असली तरी एसटीला सावरण्याचे काम मालवाहतुकीने केले. मालवाहतूक करणाऱ्या ५० ट्रकनी थोडी थोडकी नव्हे, तर गेल्या दोन महिन्यांत तब्बल १ कोटी ६४ लाख ६९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून एसटीला मोठा हात दिला आहे. परंतु यासाठी वापरात असलेल्या गाड्या भंगारात निघाल्याने, चांगले उत्पन्न मिळवून देणारी मालवाहतूक करणारी कारगो सेवा बंद करण्यात आली.

-----
चौकट
दृष्टिक्षेपात रत्नागिरी एसटी विभाग

* मुख्य आगार- नऊ
* वाहतूक नियंत्रक कक्ष- १५
* आगार- ७
* नियते- ५३८
* प्रवासी मार्ग- १२००
* गाड्या- ६६२
* शहरी गाड्या- ३७
* एक विभागीय कार्यालय, कार्यशाळा, टायरप्लांट.

-------------
चौकट
रत्नागिरी विभागातील रा.प.कर्मचारी स्थिती. (आकडा कमी-अधिक होऊ शकतो)

प्रवर्ग मंजुर नियुक्ती
* चालक १८४५ १७९६
* वाहक १८४५ १५१७
* इ. वाहतूक कर्मचारी २१८ १८४
* प्रशासकीय कर्मचारी ४९० ३३५
* कार्यशाळा कर्मचारी ९९५ ७८७
--------------------------
विभाग एकूण ५३९३ ४६१९
--------------------------

चौकट
एक नजर
* नवीन ७० एसटी गाड्यांपैकी ५० गाड्या दाखल
* टप्प्या-टप्प्याने ७४ गाड्या निघणार भंगारात (१५ लाख किमी पूर्ण)
* चालक वाहकांची ४५० पदे रिक्त
* रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली १४० सीएनजी गाड्यांचे उद्दिष्ट

-----
बसेससची स्थिती

- साध्या बसेस ५४०
- शिवशाही ३४
- स्लीपर कोच २४
- शहरी २४
- मागवलेल्या बसेस ४०
- एकूण ६६२

-------

वडापने कंबरडे मोडले
अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात महामंडळाने अनेक तक्रारी केल्या. न्यायालयाने अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे आदेशही दिले. तरीही अवैध प्रवासी वाहतुकीने एसटीचे कंबरडे मोडले आहे. चिपळूणमधून मुंबई, पुणेसह रत्नागिरी मार्गावर खासगी वाहतूक जोरात सुरू आहे. ग्रामीण मार्गावर दररोज खाजगी वाहतुकीची वाहने धावताना दिसतात. एसटीच्या तुलनेत खासगी वाहतूक सरस ठरत असल्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देतात. मिरज, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई मार्गावर दररोज ३० ते ३५ चारचाकी वाहने धावतात. चिपळूण–पुणे मार्गावर दररोज दहा ते बारा टेम्पो ट्रॅव्हल्स धावतात. चिपळूण आणि गुहागरमधून मुंबई मार्गावर ९ ट्रॅव्हल्स आहेत. या दोन्ही मार्गावर चिपळूण आगारातून पहाटे साडेपाच वाजता वाहने सुरू होतात, तर रात्री साडेअकरा वाजता शेवटची एसटी सोडली जाते. मात्र एसटी बसचा दर्जा आणि चालक-वाहकांची अरेरावी यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहेत. तसेच रत्नागिरी शहरातूनच २५ ते ३० खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. पॉश गाड्या, स्लिपर कोच, सेटींग व्यवस्था असलेल्या ट्रॅव्हल्सना प्रचंड मागणी असून त्या कायम फुल्ल असतात. सणासुदीला तर हजार ते पंधराशे रुपये देऊन प्रवास करण्यासही प्रवासी प्राधान्य देतात. मग एसटीच्या गाड्यांना प्रवाशांची पसंती का नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्याचा एसटीने प्रयत्न केला, मात्र त्याला फारसे यश आलेले नाही. ग्रामीण भागातील मार्गावर धावणारी वडापची गाडी असो किंवा राष्ट्रीय महामार्गावर धावणारी असो – ती एका प्रवाशासाठी कुठेही थांबते आणि त्याला सोयीच्या ठिकाणी उतरवते. आरामदायी प्रवासासाठी महिला देखील खासगी वाहतुकीलाच प्राधान्य देतात. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागात आहे.

------

चौकट
प्रवाशांच्या अपेक्षा
गावोगावी एसटीच्या गाड्या धावत आहेत. राजापूर एसटी आगारातून तालुका आणि तालुक्याबाहेर प्रवाशांसाठी २९८ फेर्‍या मंजूर आहेत. त्यापैकी २८५ फेर्‍या सुरू असून १३ बंद आहेत. बंद असलेल्या फेर्‍या लांबपल्ल्याच्या आणि कमी भारमानाच्या आहेत. मात्र ग्रामीण भागात वस्तीला जाणाऱ्या जैतापूर, येरडव, बुरंबेवाडी यासह अन्य काही गाड्या अनेकदा निर्धारीत वेळेपेक्षा अर्धा–पाऊण तास उशिरा सुटतात. याची प्रवाशांना पूर्वकल्पना दिली जात नाही. अचानक फेरी रद्द केल्यामुळे प्रवाशांना ताटकळत रहावे लागते आणि वेळापत्रकाचे प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फिरते. ग्रामीण भागातील अनेकांची घरे एसटी थांब्यापासून दूरवर असतात. तिथे पायवाटेने किंवा जंगलभागातून जावे लागते. वेळेत गाडी न सुटल्याने प्रवाशांची ओढाताण होते. हे चित्र कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळते. याची सर्वाधिक झळ चिपळूण, खेड, मंडणगड, गुहागर आणि लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात जाणवते.

-----
चौकट

रिक्त पदांची संख्या अधिक
रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे हंगामी पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करून घेतले जाते. त्यामुळे एकाच माणसाला दोन-दोन कामं करायला लागतात. यामुळे पूर्ण क्षमतेने तो कर्मचारी त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. एसटीमध्ये भरती करून काटेकोर व्यवस्थापन, नियमांमध्ये बदल केल्यास एसटी फायद्यात येऊ शकते, असे एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सांगितले.


कोट १
चिपळूण आगारात चांगल्या आणि स्वच्छ बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारमान व वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. काही बस मध्ये केवळ विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होते. चालक वाहकांना आम्ही प्रवाशांशी सौजन्याने वागण्याची सूचना करतो परंतु प्रत्येक कर्मचाऱ्यावरती लक्ष ठेवता येत नाही. तो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. तरीही चिपळूण आगाराचा तोटा कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पूर्वीचा तोटा आता तीन ते साडेतीन लाखावर आला आहे.
- दीपक चव्हाण, आगार प्रमुख, चिपळूण.

----

कोट २
एसटीच्या गळक्या बसेसमुळे यंदाच्या पावसाळ्यात भरपूर त्रास झाला. याबाबत संबंधित वाहक अथवा अधिकाऱ्यांकडे तक्रार करून फारसा उपयोग झालेला नाही. अनेक लोक नाईलाज म्हणून एसटीने प्रवास करत आहेत. परंतु बऱ्याच जणांचा कल दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदीकडे दिसतोय.
- दिगंबर साटम

-----
कोट ३
गेल्या काही महिन्यांपासून दिवसाच्या आणि सायंकाळी वस्तीच्या गाड्या उशीरा सुटत आहेत. त्यामुळे प्रवाशांना घरी जायला उशीर होतो. याचा सकारात्मक विचार करून एस.टी. आगार प्रशासनाने गाड्यांच्या वेळापत्रकाचे योग्य नियोजन करावे ही अपेक्षा.
- शरद देसाई, प्रवाशी

-----
कोट ४
एसटी ही जनतेच्या सेवेसाठी आहे. ती चालण्यासाठी नफा झाला पाहिजे. त्यासाठी सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. भारमान असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि तिथे बसेस सुरू कराव्यात. विद्यार्थ्यांसाठी गाड्या सुरू झाल्या पाहिजेत. पावसाळ्यात गळक्या बसेस सोडू नयेत. प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेऊन नियोजन केले तर निश्चितच एसटी फायद्यात येईल.
– हारीस शेकासन, नेते, काँग्रेस

Marathi News Esakal
www.esakal.com