झेंडुची आवक वाढल्याने दरावर परिणाम
rat21p16.jpg
93011
रत्नागिरीः शहरातील जयस्तंभ परिसरात झेंडुची फुले विकणारे विक्रेते.
---------
झेंडुची आवक वाढल्याने दरावर परिणाम
विक्री प्रति किलो १०० ते १५० रूपये; आठ ते दहा टन आवक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ः जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. मात्र रविवारी सर्वपित्री अमावस्या असल्याने अनेकांनी सायंकाळपर्यंत खरेदीला बाहेर पडणे टाळले होते. त्यामुळे फुलं खरेदीसाठी नागरिकांची गर्दी नव्हती. सध्या पश्चिम महाराष्ट्रातून बाजारात झेंडुची आवक वाढल्यामुळे दरही कमी झाले आहेत. झेंडुची विक्री किलोला १०० ते १५० रूपये इतकी होत आहे.
रत्नागिरी शहरासह परिसरात विविध फुल विक्रेत्यांकडे पश्चिम महाराष्ट्रातून झेंडुची सुमारे ८ ते १० टन एवढी आवक होत असते. उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होत असून देवींची प्रतिष्ठापनाही होणार आहे. त्यासाठी स्थानिक फुलविक्रेत्यांसह परजिल्ह्यातील शेतकरीही झेंडुची फुले घेऊन रत्नागिरीसह ठिकठिकाणी दाखल झालेले आहेत. महिन्याभरापुर्वी झेंडुच्या फुलांचे दर किलोला २५० ते ३०० रूपये इतके होते. उत्सवासाठी यंदा फुलांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परीसरात फुले विकणारे १०० रूपये किलोने झेंडु विकत आहेत. त्यात रविवारी सर्वपित्री आमावस्या आणि रविवार असल्याने बाजारात तेवढी गर्दी नव्हती. सायंकाळी ४ वाजल्यानंतर तुरळक ठिकाणी नागरिकांची उपस्थिती पहायला मिळत होती. त्यात ढगाळ वातावरण आणि मध्येच सुरू झालेल्या पावसाने ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले. त्यामुळे विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. विक्रीसाठी आणलेला झेंडू वाया जाण्याची भिती व्यापाऱ्यांमध्ये होती. सायंकाळी उशिरा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर लोकं खरेदीसाठी बाहेर पडत होती. परंतु उद्यापासून खऱ्याअर्थाने फुलांच्या खरेदीला वेग येईल अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
----
चौकट
नारळाची आवक कमी
उत्सवासाठी महत्त्वाच्या असलेल्या नारळांच्या दरात झालेली आहे. बाजारात नारळाची आवक कमी झाल्यामुळे सध्या नारळ ४० ते ५० रुपये प्रति नग दराने विकले जात आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
कोट
सध्या मोठ्याप्रमाणात फुले रत्नागिरीत विक्रीसाठी आली आहेत. त्यामुळे दर कमी झालेले आहेत.
- निखिल पवार, फुल विक्रेते