सावर्डे-वालावलकर रुग्णालयात बुबूळ प्रत्यारोपण यशस्वी

सावर्डे-वालावलकर रुग्णालयात बुबूळ प्रत्यारोपण यशस्वी

Published on

वालावलकर रुग्णालयात
बुब्बुळ प्रत्यारोपण यशस्वी
डॉ. मनीषा वाघमारे : गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया
सावर्डे, ता. २२ : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पहिली बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. नेत्रतज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश मिळाले. वालावलकर रुग्णालयातील आयसीयूमधील एका रुग्णाचा ३ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. तत्काळ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रियांका पाटील व त्यांचे सहकारी यांनी त्या रुग्णाचे दोन्ही डोळे नेत्रदानासाठी स्वीकारले. यानंतर सर्व गरजवंत अंध असलेल्या रुग्णांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला. त्यापैकी एक रुग्ण शस्त्रक्रिया करण्याकरिता सहमत झाला. हा रुग्ण बऱ्याच वर्षांपासून अंध होता. त्याच्या डाव्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी मार लागल्यामुळे समोरील दृष्टिपटल म्हणजेच कॉर्निया पांढरा पडला होता. तो पारदर्शक राहिला नव्हता. त्यामुळे रुग्णाला काहीही दिसत नव्हते तसेच मोतीबिंदूही झाला होता. तो मोतीबिंदू पिकून फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसोबतच मोतीबिंदूची ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ११ सप्टेंबरला ही गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया अत्यंत अनुभवी नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनीषा वाघमारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सागर पाटील व डॉ. भूषण इंगवले यांनी त्यांना सहकार्य केले. भूलतज्ज्ञ डॉ. लीना व त्यांचे इतर सहकारी यांनी पेशंटला भूल देण्याचे काम केले.

कोट
ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत झाली.
- डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका

चौकट
नेत्रदानासाठी काय करायला हवे?
मृताचे डोळे अर्धवट मिटलेले असतील, तर ते पूर्ण बंद करावेत. डोळे कोरडे पडू नयेत, यासाठी त्याच्यावरती थंड पाण्याची पट्टी ठेवावी. मृताचे डोके थोडेसे उंच करून उशीवर ठेवावे. खोलीतील पंखे बंद ठेवावे‌त. मृत्यूनंतर आपल्या फॅमिली डॉक्टरकडून मृत्यूचे प्रमाणपत्र घ्यावे, त्यानंतर ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करावा.

Marathi News Esakal
www.esakal.com