रस्ता अर्धवट, खड्डे मात्र खोल

रस्ता अर्धवट, खड्डे मात्र खोल

Published on

93307

रस्ता अर्धवट, खड्डे मात्र खोल

तळेरे-कोल्हापूर महामार्गाचे ग्रहण सुटेना, वाहतुकीत मोठी घट

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ ः तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाला दोन वर्षांपासून नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. आता देखील कळे ते सांगशी हा महामार्ग वाहतुकीस धोकादायक झाला आहे. त्यामुळे एकीकडे काँक्रीटीकरण सुरू असले तरी दुसरीकडे खड्डेमय प्रवास वाहनचालकांना नकोसा झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक २० ते २५ टक्केवर आल्याने महामार्गावरील सर्वच शहरातील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या महामार्गाला लागलेले ग्रहण सुटणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तळेरे-कोल्हापूर या ९२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे टप्प्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटर लांबीच्या काँक्रीटीकरण आणि मजबुतीसाठी १७१ कोटी मंजूर झाले. हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात गगनबावडा ते करूळ जामदारवाडी आणि कोकिसरे घंगाळेवाडी ते नाधवडे अशा २१ किलोमीटर लांबीच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये या महामार्गावरील साडेनऊ किलोमीटर लांबीच्या करूळ घाटमार्गाचा समावेश होता. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात तळेरे ते नाधवडे आणि कोकिसरे-नारकरवाडी ते करूळ-जामदारवाडी या कामाला मंजुरी मिळाली. तळेरे-कोल्हापूर या महामार्गावरील ९२ किलोमीटरपैकी साधारणपणे ५४ किलोमीटरचे काँक्रीटीकरण मंजुर होते. त्यापैकी ४८ किलोमीटर काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मंजुर असलेल्यापैकी सहा किलोमीटरचे काम विविध कारणांमुळे अपुर्ण आहे. मात्र, काँक्रीटीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर रूंदीकरणासाठी करावी लागणारी खोदाई आणि इतर कामे सुरू होताच वाहनचालकांनी या महामार्गाकडील कल कमी केला. दुसऱ्या टप्प्यात करूळ घाटमार्गाचे काम सुरू झाले आणि हा घाटमार्ग २२ जानेवारी २०२४ ला वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात सुरू असलेली वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. कोल्हापूर ते सिंधुदुर्ग प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी फोंडा, आंबोली घाटमार्गाचा अवलंब करण्यास सुरूवात केली. त्याचा मोठा परिणाम झाला. करूळ घाटमार्गे सर्वाधिक ३२ हजार टन वाहतूक सुरू होती. ती पूर्णतः बंद झाल्यामुळे त्याचा विपरित परिणाम गगनबावडा, साळवण, वैभववाडी, कळे, कुडित्रे, तळेरे याठिकाणी असलेल्या व्यवसायावर झालाच. परंतु, महामार्गालगत सुरू केलेल्या अनेक हॉटेल व्यवसायावर झाला. चांगल्या स्थितीत सुरू असलेली आणि लाखो रूपयांची उलाढाल दिवसाला होत असलेली हॉटेल्स बंद करावी लागली. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. करूळ घाट वाहतुकीस खुला झाला आहे. तळेरे ते गगनबावडा आणि कळे ते कोल्हापूर या मार्गावरील काही अपवाद वगळता रस्ता वाहतुकीस उत्तम झाला आहे. परंतु, कळे ते सांगशी हा महामार्ग आता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. साधारणपणे ३८ किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांना नकोसा झाला आहे. या महामार्गावर दहा दहा फुट लांबी रूंदीचे आणि दीड दोन फुट खोलीचे खड्डे आहेत. हे काम देखील मंजुर असल्यामुळे महामार्ग प्रधिकरण खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी या महामार्गावरील वाहतूक २० टक्केवर आली आहे. त्यामुळे महामार्गावरील सर्व शहरांच्या व्यवसायावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिक तर मेटाकुटीला आले आहेत. या महामार्गाला तीन वर्षांपासून लागलेले ग्रहण नेमके सुटणार कधी? असा प्रश्न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.
-------------
कोट
महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. वाहनचालकांनी मार्गच बदलला आहे. त्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखो रूपये कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे सर्वच व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
- नितेश पाटील, हॉटेल व्यावसायिक, वैभववाडी
--------------
तळेरे-गगनबावडा महामार्गावरील चार किलोमीटरचे काम शिल्लक आहे. काही ठिकाणी भू-संपादनचा विषय आहे. काही ठिकाणी जोडरस्त्याचा विषय आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- पवन पाटील, शाखा अभियंता, महामार्ग प्रधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com