लांजा-उमेश कदमांचे २ ऑक्टोबरला उपोषण
इसवलीतील निकृष्ट रस्त्याबाबत
ग्रामस्थांचे दोन ऑक्टोबरला उपोषण
लांजा, ता. २२ ः निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी इसवली येथील ग्रामस्थ उमेश कदम २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
याबाबतचे पत्र ग्रामस्थ उमेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. इसवलीमठाचा पऱ्या ते सतीचा उंबर या रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात आले होते; मात्र अवघ्या दीड ते दोन महिन्यांतच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागामार्फत ठेकेदार उषा प्रवीणकुमार राठोड यांना नोटीस बजावून हे काम गुणवत्तापूर्ण करावे अन्यथा काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असली तरीही रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच बांधकाम उपविभाग, लांजा या विभागातील ज्या अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदाराला मजबुतीकरण डांबरीकरणाबाबत दाखला दिला, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर दोषी असल्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करावी, अशा मागण्या उमेश कदम यांनी केल्या आहेत.