साकेडीतील रेल्वे फाटक अंडरपासला मंजुरी
kan232.jpg
93459
साकेडीः येथील रेल्वे फाटक अंडरपासच्या कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
साकेडीतील रेल्वे फाटक
भुयारी मार्गाला मंजुरी
दोन कोटींचा निधी मंजूरः सरपंच सुरेश साटम यांची माहिती
कणकवली, ता. २३ः तालुक्यातील साकेडी गावातील रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या लवकरच दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून येथील भुयारी मार्गासाठी मंजुरी मिळाली असून या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या भुयारी मार्गासाठी माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे गावकऱ्यांची प्रदीर्घकाळची मागणी पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती साकेडी सरपंच सुरेश साटम व उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी दिली.
सध्या रेल्वे गाडी ये-जा करताना फाटक बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, रेशन दुकान, आरोग्यकेंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांकडे जाणे कठीण झाले होते. रेल्वे फाटकामुळे गाव दोन भागांत विभागले गेले असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
याची दखल घेऊन भुयारी मार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच काम सुरू होणार आहे. यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका तसेच ग्रामस्थांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार असल्याचे सुरेश साटम म्हणाले.